For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पन्हाळा तालुक्यात आजही मुलगी ‘नकोशी’!

10:00 PM Jan 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
पन्हाळा तालुक्यात आजही मुलगी ‘नकोशी’
Kolhapur ZP

पन्हाळा तालुक्यात 0 ते 6 वयोगटातील दर हजार मुलांमागे 873 मुली; चंदगड तालुक्यात दर मुलांमागे 979 मुली; स्त्री भ्रुणहत्येमुळे मुलींची संख्या घटलेलीच

कृष्णात चौगले कोल्हापूर

स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी शासनाने केलेला कडक कायदा आणि समाजामध्ये केल्या जात असलेल्या प्रबोधनानंतरही मुलींचा टक्का घटत असल्याचे चित्र आहे. शासन, सामाजिक संस्थांकडून केल्या जाणाऱ्या जनजागृतीनंतरही लेक ‘नकोशी’ वाटत आहे. जिह्यात डिसेंबर 2023 अखेर दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण 925 होते. यामध्ये पन्हाळा तालुक्यात मुलींचे प्रमाण सर्वात कमी 873 इतके असून चंदगड तालुक्यात लेकींचा टक्का सर्वाधिक 979 इतका आहे. ‘लेक वाचवा’ अभियानात चंदगड तालुका नेहमीच जिह्यात आघाडीवर असून पन्हाळा तालुका वर्षानुवर्षे पिछाडीवरच राहिल्याचे चित्र आहे.

Advertisement

वाशीनाका येथे गर्भलिंगनिदान करणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे समाजामध्ये आजही मुलगी ‘नकोशी’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई एका बोगस डॉक्टरावर झाली असली तरी जिह्यात स्त्रीभ्रुणहत्येच्या प्रक्रियेमध्ये मोठी साखळी कार्यरत आहे. महिला-पुऊष जन्म दराबाबत माहे डिसेंबर 2023 अखेरच्या आढाव्यानुसार कोल्हापूर जिह्यामध्ये दर हजार मुलांमागे 925 मुली असा जन्म दर आहे. जिह्यातील पन्हाळा, राधानगरी, कागल या तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर सर्वात कमी आहे. तर मागासलेला आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगड तालुक्यामध्ये सर्वात जास्त 979 इतके मुलींचे सरासरी प्रमाण आहे. तर जिह्यात पन्हाळा तालुक्यात सर्वात कमी 873 मुलींचे सरासरी प्रमाण आहे. गेल्या आठ वर्षांपूर्वी दरहजार मुलांमागे मुलींचे प्रमाण सुमारे 150 ते 175 पर्यत कमी आढळल्याने शासनाने स्त्रीभ्रुणहत्या रोखण्याची मोहिम हाती घेतली. विविध स्तरावरून जनजागृती करण्यास सुरू केली. यावेळी पन्हाळा तालुक्यात मुलींचे सरासरी प्रमाण सर्वात कमी होते. आजही त्यामध्ये फारशी सुधारणा झालेली नाही.

वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी शासनाने उचलेले पाऊल आणि साक्षरतेमुळे ‘हम दो हमारे दो’ च्या नाऱ्याची शहरासह वाड्यावस्त्यावरही अंमलबजावणी होण्यास मदत झाली. त्यामुळे लोकसंख्येची वाढ एका मर्यादेपर्यंत रोखण्यात यश आले असले तरी ‘वंशाला दिवा’ ही मूळ संकल्पना जशीच्या तशीच राहीली. त्याला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली. पोर्टेबल सोनोग्राफी मशिनच्या सुविधेमुळे गर्भलिंग चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने ‘लेक वाचवा’ अभियान हाती घेतले. पण यातून लेकींचे प्रमाण वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.

Advertisement

स्त्री भ्रुणहत्येमध्ये बोगस डॉक्टर आघाडीवर
जिह्याच्या दुर्गभ भागात अनेक बोगस डॉक्टरांनी दवाखाने थाटले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे याबाबत परिपूर्ण माहिती असूनही कारवाईबाबत ते का दूर्लक्ष करतात हा एक यक्षप्रश्न आहे. विशेषत: शाहूवाडी, राधानगरी, चंदगड व सीमाभागातील अनेक बोगस डॉक्टर स्त्रीभ्रुणहत्यात्येच्या रॅकेटमध्ये सक्रिय आहेत. यातून त्यांनी लाखो रूपयांची माया जमवली आहे. अशा बोगस डॉक्टरांची जि.प.च्या आरोग्य विभागाकडे यादी देखील आहे. पण त्यांच्यावर आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

Advertisement

मुला-मुलींचे प्रमाण एकास एक होण्याची गरज
0 ते 6 वयोगटातील मुलींच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढ झाली असली तरी यावर समाधान न मानता आरोग्य विभागाकडून हे प्रमाण एकास एक करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी दरमहा लसीकरण सत्रात उपस्थित असणाऱ्या महिलांना प्रबोधन करून आरोग्य शिक्षण देणे, गर्भलिंगनिदान कायद्याची अंमलबजावणी करणे, तसेच लेक वाचवा अभियानांतर्गत निरनिराळ्या योजनांची माहिती देऊन मुला-मुलीचा जन्म दर समान करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजनपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तालुकानिहाय महिला-पुरूष जन्मदर प्रमाण (डिसेंबर 2023अखेर )
तालुका लिंग प्रमाण
चंदगड 979
गगनबावडा 929
आजरा 923
शाहूवाडी 934
हातकणंगले 934
गडहिंग्लज 947
राधानगरी 893
कागल 906
पन्हाळा 873
भुदरगड 923
शिरोळ 937
करवीर 927
एकूण 925

Advertisement
×

.