एका ऐकण्याची गोष्ट...भेरा
कोकणातलं निवती, कोचरे, भोगवे या पट्ट्यातलं एक खूप मागास गाव! जिथे माणूस आजारी पडला तर त्याला डोलीतून किंवा चक्क हातावर उचलून साकवाच्या पलीकडे न्यावं लागतं. पायवाटेने डोंगर चढावा लागतो तेव्हा कुठे हमरस्ता लागतो. आणि तिथून कुडाळ किंवा सावंतवाडीला नेण्याशिवाय पर्याय नसतो. आजही अशी गावं आहेत सह्याद्रीपट्टीत डोंगराच्या पायथ्याशी. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि काही भाग वेंगुर्ल्याचाही आहे. जिथे अजूनही पायाभूत सुविधा सुद्धा नीटपणाने पोहोचलेल्या नाहीत. या सगळ्या गावांचं मोठं वैशिष्ट्या म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात अफाट कोसळणारा पाऊस! अखंड धोधो अखंड रिपरिप. कानाचे दडे बसतील, माणसाला बहिरं व्हायला होईल इतका पाऊस पडत राहतो. घरातून बाहेर पडणं मुश्किल. ओरडून बोललेलंदेखील दुसऱ्याला ऐकू येत नाही. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे कडकडणाऱ्या विजा! आपल्याला कान आहेत की नाहीत असा प्रश्न पडावा असा असतो हा पावसाळा. आपल्याला वाटतं हा पाऊस नसून जिवंत माणूस आहे. खरं तर माणूस नव्हे राक्षसच आहे सगळ्यांना बहिरं करून सोडणारा राक्षस. सगळ्यांच्या हाडापर्यंत थंडी पोहोचवून मोडून पाडणारा पाऊस.
या पावसाने त्या गावांचे रुपडे मात्र पालटून गेलेलं असतं. डोळे बघून विटतील इतका हिरवागार रंग, अतिशय घनदाट जंगलं, अनाघ्रात वनराई, खळखळ वाहणारे ओढे, त्याच्यावर बांधलेले डगमगते साकव, तो साकव पार व्हायला म्हणजे ‘गारंबीचा बापू’ मधल्या ‘विठोबा’चंच धाडस हवं! त्या साकवाच्या दोन्ही बाजूला कुकारे घालून माणसं एकमेकांशी संपर्क साधत असतात. त्यातले एकमेकाला किती ऐकू जाते ते तो देवच जाणे किंवा तो देवही बहुतेक कानात बोळेच घालून बसलेला असतो. हे बहिरेपण हे मुद्दामच आणलेलं. देवसुद्धा असा आहे, जेव्हा त्याला ऐकायचं नसतं तेव्हा तो कानात बोळेच घालून बसतो. आणि मग मालवणी माणूस म्हणतो ‘देवाकय आयकांक येणाहा नाय काय मियां रडटंय तां?’ अशाच गावात एक गाणं नसणारं गाणं ऐकायला मिळतं. खरं म्हणावं तर ते ऐकायला येत नाही. ते कानात मावणारं गाणं नाहीच मुळी! तो एक विराट रुद्रनाद आहे. त्यामुळे दुसऱ्याला काही सांगताही येत नाही. पण ते गाणं असतं. काही वेळा गाणं कानात नसलं तरी मनात मात्र असतं. असतं एक देवाचं लेकरू! त्याला बहुधा देवाने सांगितलेल्या गोष्टी तेवढ्याच ऐकू येत असाव्यात म्हणून या लोकातली माणसं काय बोलतात ते त्याला काही केल्या ऐकू येत नाही. आणि ऐकू येत नाही म्हणून त्याला दुसऱ्याशी बोलता पण येत नाहीत. म्हणजे तो ठार बहिरा असतो. यालाच मालवणीत ‘भेरा’ असं म्हणतात. सध्या याच नावाचा एक मालवणी चित्रपटही गाजतो आहे. राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिके पटकावलेला. आणि जगभर भरारी घेण्यासाठी उत्सुक असलेला. अभिनय करणाऱ्या सर्व मंडळींनी अभिनयाची बाजू फार उत्तमपणे सांभाळली आहे. ज्याला बोलता येत नसतं त्याला बोलण्याचा अभिनय करणं जड. पण ज्याला ऐकता बोलता व्यवस्थित येत असतं त्यानं मूकबधिर मुलाचा अभिनय करणं हे त्याहून कठीण. म्हणून तर हे आव्हान म्हणजे शिवधनुष्य आहे आणि कोकणच्या सुपुत्रानंच ते पेलून दाखवलंय.
प्रत्यक्ष या सिनेमांमध्ये कुठेही न दिसणारं पण प्रोमो सॉंग म्हणून प्रसिद्ध झालेलं ‘मी तुका काय दिलंय म्हणान माझा इतक्या करतं?’ हे गाणं विलक्षण बोलकं आहे. सिनेमातली ती अनीबाय भेऱ्या विष्णूला जेव्हा विचारते की ‘बाबा रे मी तुका दिलंय तरी काय? म्हणान तू माझा इतक्या सगळा करतं?’ तेव्हाचा त्या दोघांचा मुद्राभिनय पाहताना डोळ्यांच्या कडा केव्हा ओल्या होतात ते समजत देखील नाही. पोरक्या विष्णूचा बहिरेपणा हा जन्मजात असतो. पण कुणाची तरी छत्रछाया हवी म्हणून त्याचं मन जे आक्रंदन करीत असतं ते त्याच्या मामाला ऐकूच जात नसावं. म्हणून मामा हा कान असूनही भेरा असतो. मामाची मुलगी ही विष्णूला मोठ्या बहिणीची माया लावते. त्यामुळे बाप कितीही ओरडला तरी ती विष्णूच्या पाठीशी उभं राहणं सोडत नाही. म्हणजे याबाबतीत ती बाबाचं ऐकूनही न ऐकल्यासारखं करते. हे तिने केवळ तिच्या भावासाठी आणलेलं मायेस्त बहिरेपण असतं. सरपंचाला गावातल्या सगळ्या लोकांचा आक्रोश ऐकू येत असतो. गावच्या या प्रथम नागरिकाला गावाच्या समस्या अडचणी कळत असतात. पण सरकारी नियमापुढे त्याला बहिरं व्हावंच लागतं. लोकांचे आक्रोश कानात जाऊ नये म्हणून सरकारी कागदांवरच्या सूचनांचे बोळे कानात आणि मनात वागवत सिनेमाभर तो फिरत राहतो. हे बहिरेपण त्याच्यासाठी वेदनादायी नक्कीच असेल. आणि इतरांसाठी तर असतंच. पोलीस यंत्रणेला तर डोळे असून आंधळेपणा, कान असून बहिरेपणा आणि तोंड असून मुकेपणा इतक्या ठिकाणी दाखवावा लागतो, की त्यांनाही संवेदनशील मन आहे हे त्यांना सुद्धा लक्षात नसतं. परमेश्वर काही केल्या आपलं ऐकत नाही. समुद्राने आपला मुलगा गिळला याचं अपार दु:ख मनात घेऊन गरिबी, एकटेपणा आणि पोटाचा आजार अंगावर काढत अनीबाय आपल्या घरात एकटीच वावरत असते. मुंबईतून आलेल्या तिच्या दुसऱ्या मुलाला क्वारंटाईन ठेवलेलं असतं हे समजल्यावर तिने कितीही हाका मारल्या तरी अख्खा गाव बहिरा झाल्यासारखा तिला वाळीत टाकतो. सिनेमाभर अफाट पडणारा पाऊस, समुद्राची गाज कोंडीतले भोवऱ्याचे आवर्त, डगमगणाऱ्या साकवाची कुरकुर आणि लक्षपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या माणसांची अर्थहीन बडबड या सर्व गोष्टी संवेदनशील मनालाही बहिरं करून सोडतील इतक्या ऐकू येतात.
सूचकता हा दिग्दर्शनाचा विशेष आहे. इथे सिनेमाभर निरनिराळ्या माणसांचा आणि निसर्गाचाही बहिरेपणा खूप वेगवेगळ्या पातळीवर सूक्ष्मपणे आणि स्थूलपणे आपल्या अंगावर येत राहतो. इथे राहणारी माणसं गरीब आहेत. पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधनंही नाहीत. हे ठिकाण दुर्गम आहे. या कशाकशाचाही विचार निसर्गाला नसतो. तो आपलं काम करीतच असतो. हा पाऊस नकोनकोसा वाटतो. कारण या पावसासोबत असणारी गरिबी, अंधपणा, गतानुगतिकता ही पाहणाऱ्याला अस्वस्थ करून सोडते. प्रत्येक फ्रेम बोलकी आहे. दिग्दर्शकानं माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना, निर्जीव वस्तूंना, वहाळाला, साकवाला, अर्ध्या साकवावर टांगती राहिलेल्या बॅगला, घराभोवती पडल्या चढल्या सामानाला, कचऱ्याला, समुद्राला आणि दगडांनाही बोलकं केलंय. प्रत्येक गोष्टीला अपार वेदना चिकटलेली आहे. वाईट एकच आहे की एकाही वेदनेचा आक्रोश दुसऱ्या कोणाला ऐकूच जाऊ नये का? कोकणच्या ऑफबीट लोकेशनचा अत्यंत सुंदर, अप्रतिम म्हणावा असा वापर या कलाकृतीला नि:संशय श्रेष्ठ घडवतो. पार्श्वसंगीतही अद्यतन म्हणावं लागेल. आणि रूढार्थाने एकही गाणं नसलेला हा चित्रपट स्वत:च एक आर्त गाण्यासारखा घडून गेलाय हे जाणवतं. ‘भेरा’ थिएटरमध्ये येण्यासाठी आपल्याला 21 मार्चपर्यंत वाट पहावी लागेल. पण सिंधुदुर्गात याचं क्रीनिंग झाल्यामुळे हा अद्भुत चित्रपट पहायला मिळाला आणि कानाची आणि गाण्याची ही वेगळी बाजू जाणवली ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखनप्रपंच...
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु