बंगालच्या उपसागरात येणार वादळ
ओडिशा, पश्चिम बंगालला रेड अलर्ट : राज्यात पुढील तीन दिवस पाऊस
पुणे / प्रतिनिधी
पूर्वमध्य बंगालचा उपसागर तसेच दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, याची तीव्रता वाढून, त्याचे बुधवारपर्यंत वादळात रुपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. हे क्षेत्र उत्तरपश्चिमेच्या दिशेने प्रवास करणार असून, ते पश्चिम बंगाल, ओडिशा किनारपट्टीला धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर अंदमानच्या समुद्रात हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली होती. सोमवारी पहाटे या स्थितीचे कमी दाबाच्या क्षेत्रात ऊपांतर झाले. पुढे या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून, 23 ऑक्टोबरला सकाळी याचे वादळात रुपांतर होईल. 24 ऑक्टोबरला सकाळी हे वादळ ओरिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकणार आहे.
ओडिशा व प. बंगालला रेड अलर्ट
या काळात समुद्र खवळलेला राहणार असून, जोरदार वारे वाहणार आहेत. 24 तसेच 25 ऑक्टोबर रोजी या भागात अतिवृष्टीचा ओडिशा, पश्चिम बंगाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर याची तीव्रता कमी होणार आहे.
चक्रीवादळाचे नाव ‘दाना’
दरम्यान,या चक्रीवादळाला दाना हे नाव देण्यात आले असून, कतार या देशाने हे नाव दिले आहे.
अरबी समुद्रातील क्षेत्र किनारपट्टीपासून दूर
पश्चिममध्य अरबी समुद्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात आहे. याचा भारतीय किनारपट्टीला धोका नाही.
राज्यात वादळी पाऊस
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणात बाष्प येत आहे. याशिवाय दिवसा कडकडकीत ऊनामुळे राज्यातील वातावरणात बदल होत असून, दुपारनंतर सर्वदूर वादळी पाऊस होत आहे. गुऊवारपर्यंत ही स्थिती राहणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा मारा थोडा कमी हेईल.