कालमणी शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने पालकमंत्र्यांना निवेदन
शाळेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
खानापूर : तालुक्यातील कालमणी येथील मराठी शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नुकतेच देण्यात आले. याबाबत पालकमंत्र्यांनी आपण शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. कालमणी येथील मराठी शाळेची स्थापना 1945 साली झालेली आहे. अतिशय दुर्गम भागात असलेल्या या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी सिद्धेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून शाळेची विकासकामे हाती घेतली आहेत. शाळेच्या विकासाचा खर्च अंदाजे 1 कोटीच्या घरात असून आतापर्यंत 16 लाख देणगीरुपात जमा करून शाळेचा विकास करण्यात आलेला आहे.
मात्र शाळेच्या विकासासाचा खर्च मोठा असल्याने माजी विद्यार्थी संघटनेने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची बेळगाव येथे नुकतीच भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. तसेच शाळेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची सर्व माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कालमणी शाळेला निश्चित शासनाकडून विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कालमणी शाळेची पाहणी करून विकासाबाबत आराखडा तयार करण्यासाठी आपल्या सचिवांना सूचना केल्या आहेत. पालकमंत्र्यांना निवेदन देताना अनिल कालमणकर, व्यंकटेश नाईक, सत्यदेव नाईक, तानाजी बिर्जे, कृष्णा भरणकर, शांताराम नाईक, मिलींद नाईक, शिवाजी सावंत व माजी विद्यार्थी संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.