For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लढतीचा ‘नूर’ बदलू शकणारा फिरकीपटू !

06:00 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
लढतीचा ‘नूर’ बदलू शकणारा फिरकीपटू
Advertisement

मागील अनेक स्पर्धांप्रमाणं यंदाची आयपीएल सुरू झाल्यानंतर ज्या गोलंदाजांवर लक्ष केंद्रीत झालं होतं त्यामध्ये आघाडीवर होतं ते अफगाणिस्तानच्या रशिद खानचं नाव. पण रशिदकडून अपेक्षेप्रमाणं  कामगिरी होऊ शकलेली नसून त्या तुलनेत जास्त भाव खाऊन गेलाय तो त्याचीच प्रतिकृती मानला गेलेला डावखुरा फिरकीपटू नूर अहमद...‘चेन्नई सुपर किंग्स’ची दमछाक संपायचं नाव घेत नसताना त्याच्याकडून होणारी प्रभावी कामगिरी जास्तच नजरेत भरलीय. यावेळचा हंगाम सुरू झाल्यापासून बराच काळ म्हणजे कालपरवापर्यंत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजासाठीची ‘पर्पल कॅप’ होती ती त्याच्याकडे. नुकतीच ती प्रसिद्ध कृष्णानं हिरावून घेतलीय...

Advertisement

नोव्हेंबर महिन्यातला ‘इंडियन प्रीमियर लीग’चा बहुचर्चित महालिलाव...चेन्नई सुपर किंग्सनं त्यावेळी दर्शन घडविलं ते अनेक चुकीच्या निर्णयांचं...परंतु त्यांना अजिबात फटका दिला नाही तो मात्र एका बाबीनं. ‘सीएसके’नं ठरविलं ते अफगाणिस्तानचा डावखुरा ‘रिस्ट स्पिनर’ नूर अहमदला तब्बल 10 कोटी रुपये मोजून करारबद्ध करण्याचा...त्यामुळं बहुतेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. नूरसाठी धडपडणारे गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरांनी सुद्धा हसतहसत चेन्नई सुपर किंग्सच्या गोटाला पुढं जाण्याची खूण केली...नेहरांचे आडाखे चुकीचे होते असं म्हणणं देखील शक्य नाहीये. कारण त्याच्या खिशात होता तो ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज अफगाणिस्तानचाच रशिद खान...

पण आता जवळपास 50 टक्के ‘आयपीएल’ पूर्ण झाल्यानंतर मात्र आशिष नेहरांनी चूक केली असंच म्हणावं लागेल. याउलट ‘सीएसके’नं 20 वर्षीय अफगाण खेळाडूला अगदी चतुराईनं उचललं अन् त्याचे फायदे पुरेपूर दिसून आलेत...रशिदला अजूनपर्यंत 8 सामन्यांत फक्त 6 बळी मिळविणं शक्य झालंय ते 9.27 इतक्या ‘इकोनॉमी रेट’नं अन् त्याची सरासरी 46.33, तर नूर अहमदनं 8 लढतींत 12 फलंदाजांना गारद केलंय ते 7.67 च्या ‘इकोनामी रेट’नं नि 17.25 सरासरीनं. विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी अत्यंत खराब झालेली असून देखील तो निराश न होता झुंजतोय...काही दिवसांपूर्वी ‘सीएसके’नं लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला तो 11 चेंडूंत नाबाद 26 धावा काढणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला. परंतु आश्चर्यचकीत झालेल्या खुद्द धोनीनंच तो पुरस्कार स्वीकारताना म्हटलं, ‘त्याच्यावर खरा हक्क आहे तो नूरचा. त्यांनी माझी का निवड केलीय तेच मला समजत नाहीये’...

Advertisement

त्या दिवशी नूर अहमदला जरी एकही बळी मिळविता आलेला नसला, तरी त्यानं चार षटकांत दिल्या त्या अवघ्या 13 धावा आणि त्या देखील हाणामारीच्या षटकांत. विशेष म्हणजे फिरकी गोलंदाजांविरुद्ध अतिशय आक्रमक पद्धतीनं खेळणारा लखनौचा कर्णधार रिषभ पंत देखील त्याच्या पुढं फिका ठरला. फिरकीपटूंना थोड्याफार प्रमाणात मदत करणाऱ्या खेळपट्टीवर ‘एलएसजी’ला 7 बाद 166 धावांवर समाधान मानावं लागलं...नूरनं लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध जी कामगिरी बजावली तशीच रशिद खाननं गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळात सातत्यानं केलीय. रशिदच्या पोतडीत आहेत इंडियन प्रीमियर लीगच्या 129 सामन्यांतील 155 बळी. गेल्या दोन-तीन वर्षांत मात्र त्याला दुखापतींनी सतावलंय. शरीराला विश्रांती न देता जगभरातील लीगमध्ये खेळल्याचा हा परिणाम. तरी देखील त्यानं टी-20 विश्वचषकात जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडविलं होतं...

बहुतेक खेळाडू सध्या रशिदला चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ लागलेत अन् त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनिल कुंबळेप्रमाणं त्यालाही ते मध्यमगती गोलंदाजाप्रमाणं सामोरे जातात. ‘गुगली’ हा त्याचा सर्वांत खतरनाक चेंडू. रशिद खानच्या अचूकतेनं देखील त्याची थोड्याफार प्रमाणात साथ सोडलीय असं वाटतंय...याउलट त्याचा चेला म्हणून गुजरात टायटन्समध्ये वावरलेला नूर अहमद सध्या त्याच्या कारकिर्दीच्या माऊंट एव्हरेस्टवर विसावलाय. ‘आयपीएल’च्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध सूर्यकुमार यादवला बाद करणारा त्याचा चेंडू आठवतोय ? त्यानं अशा पद्धतीनं चकविलं की, अत्यंत आक्रमक सूर्या क्रीझमध्ये परतण्यास अयशस्वी ठरला. त्या लढतीत नूरनं 18 धावांत चार फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखविली व ‘सीएसके’ला विजयी देखील केलं...

लखनौविरुद्धचा पराक्रम देखील असाच. सतत पाच लढती गमावलेल्या चेन्नई सुपर किंग्सला दुसरा विजय मिळविणं शक्य झालं ते नूर अहमदच्या अचूकतेमुळंच. सामन्यानंतर सीएसकेचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमॉन्सनी नूरची पाठ थोपटली...‘माझ्या मतानुसार, गोलंदाज फलंदाजाला कोणत्या पद्धतीनं बाद करतो ते अत्यंत महत्त्वाचं. त्याच्याकडे अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यानं चेंडूचा वेग देखील कमी केलाय. नूर अहमदमध्ये आत्मविश्वास असल्याचे हे संकेत. मी कित्येक गोलंदाजांचं प्रशिक्षक म्हणून निरीक्षण केलंय. पण त्याच्या चेंडूला ओळखणं मला अजूनही जमत नाहीये. तो एक अफलातून खेळाडू’, सिमॉन्स यांचे शब्द...अफगाणिस्तान म्हणजे दर्जेदार फिरकी गोलंदाजांची जणू खाणच आणि त्यांना त्यात सापडलेला आणखी एक हिरा म्हणजे नूर अहमद !

नूर अहमदच्या फिरकीचा तडाखा...

  • 11 धावांत 5 बळी ही नूर अहमदची सर्वोत्तम कामगिरी...‘टी-20’ सामन्यात दर्बान सुपर जायंट्सचं प्रतिनिधीत्व करताना पारी रॉयल्सविरुद्ध त्यानं 28 जानेवारी, 2024 रोजी हा पराक्रम केला...
  • 18 धावांत 4 फलंदाजांना गारद करणाऱ्या नूरनं ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील ही सर्वोत्तम कामगिरी केली ती चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधी करताना यंदाच्या पहिल्याच लढतीत. प्रतिस्पर्धी होते मुंबई इंडियन्स...
  • चेन्नईच्या एखाद्या फिरकी गोलंदाजानं मुंबईविरुद्ध नोंदविलेली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी. यापूर्वी 8 एप्रिल, 2023 या दिवशी रवींद्र जडेजानं 20 धावांत 3 बळी मिळविले होते...

‘आयपीएल’मधील वाटचाल...

  • अफगाणिस्तानच्या नूर अहमदला सर्वांत आधी हेरलं ते गुजरात टायन्सचे साहाय्यक प्रशिक्षक आशिष कपूर यांनी. त्यावेळी तो अफगाणिस्तानच्या 19 वर्षांखालील संघाचं प्रतिनिधीत्व करत होता...
  • नूर ‘इंडियन प्रीमियर लीग’मधील आपली पहिलीवहिली लढत खेळला त्यावेळी त्याचं वय होतं 18 वर्षं...त्यानं रशिद खानसह जोडी जुळवत दोन मोसम गुजरात टायटन्सचा फिरकी मारा जबरदस्त पद्धतीनं सांभाळला...
  • गुजरात टायटन्सतर्फे आयपीएलमधील आपल्या पहिल्याच मोसमात त्यानं 16 जणांना टिपलं आणि गुजरातला अंतिम फेरीपर्यंत धडक मारणं शक्य झालं ते त्याच्या कामगिरीमुळंच...
  • 2024 साली झालेल्या लिलावात सीएसकेनं नूरला 10 कोटी रुपयांना करारबद्ध केलं ते फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या चिपॉकचा विचार करूनच. त्यापूर्वी तीन वर्षं आधी 2021 मध्ये ‘नेट बॉलर’ म्हणून त्याला सर्वप्रथम संधी दिली होती ती चेन्नईच्याच संघानं...
  • रशिद खान व मुजिब उर रेहमान यांच्याप्रमाणंच नूर अहमद देखील जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळतोय आणि त्याच्या कौशल्यानं त्याला विश्वविख्यात बनविलंय...

लहान वयातच चमक...

  • 3 जानेवारी, 2005 रोजी अफगाणिस्तानातील हेरात इथं जन्मलेल्या नूर अहमद लकलवाननं लहान वयातच क्रिकेटमधील प्रवास सुरू केला... अवघ्या 13 व्या वर्षी तो काबूलमध्ये झालेल्या खुल्या चाचणीत सहभागी झाला असता 125 जणांतून त्याची अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवड झाली होती...
  • नूरनं 2019 च्या एप्रिलमध्ये 14 व्या वर्षी अहमद शाह अब्दाली स्पर्धेत काबुल प्रदेशमार्फत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.. त्याच वर्षी श्पागेझा क्रिकेट लीगमध्ये मिस ऐनक नाईट्सकडून त्यानं ‘टी-20’च्या जगतात पाऊल ठेवल आणि त्या स्पर्धेतील धूर्त गोलंदाजी त्याला 2020 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठीच्या अफगाणिस्तान संघाची दारं उघडून गेली...
  • 2020 पासून नूर अहमदला ‘बिग बॅश’सह विविध लीगमध्ये उतरण्याची संधी मिळालीय. ‘बिग बॅश लीग’साठी त्याला मेलबर्न रेनेगेड्सनी करारबद्ध केलं अन् सदर संघाचं प्रतिनिधीत्व करणारा तो सर्वांत तऊण परदेशी खेळाडू ठरला...
  • 2021 पासून विविध टी-20 किंवा एकदिवसीय मालिकांसाठी अफगाणिस्तान संघाचा भाग राहूनही नूरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण होण्यासाठी 2022 साल उजाडावं लागलं. तो त्यावर्षी झिम्बाब्वेविऊद्ध पहिली टी-20, तर श्रीलंकेविऊद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला...
  • नूर अहमदनं 2022 सालच्या भारतानं आयोजित केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं होतं अन् त्यानंतर तो गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात देखील खेळला...

नूर अहमदची कारकीर्द...

  • प्रकार    सामने    डाव      बळी      सरासरी इकोनॉमी रेट      सर्वोत्कृष्ट
  • वनडे     13        13        10        64.4     6.09     49 धावांत 3 बळी
  • टी-20   14        13        7          37.71   6.95     10 धावांत 4 बळी
  • आयपीएल          31        31        36        24.06   7.94     18 धावांत 4 बळी
  • आयपीएल 2025 8          8          12        17.25   7.67     18 धावांत 4 बळी

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.