चव जपलेला चटकदार वडा
कोल्हापुरात जपली आहे वडापावची खाद्यसंस्कृती
कोल्हापूर / सुधाकर काशिद :
महाद्वार रोडवर बिनखांबी गणेश मंदिराच्या मागे जोशीराव वाड्यात एक हॉटेल होते. वाईकरांचे हॉटेल असे त्याचे नाव. हॉटेल दिवसभर चालू पण सायंकाळी चार नंतर हे हॉटेल हाऊसफुल आणि हॉटेलच्या दारातही गर्दी. हॉटेलातील अगदी समोरच्या कोपऱ्यातच चुलीवर ठेवलेली तेलाची कढई. आणि दोन-तीन मोठ्या थाळ्यात उकडलेला बटाटा कांदा मोहरी कोथिंबीर लसूण याचे घरात केलेले मिश्रण. कढईवर बनियन घालून बसलेले वाईकर. उकळणारे तेल एका लयीत उकळी घेऊन फसफसू लागले की वाईकर वेगाने एक एक वडा तळायला सोडायचे.
पंधरा-सोळा वडे सोडले की झारीने हलवायचे. वडा शिजला की नाही ते तेलातील वड्याच्या तांबूस पिवळसर रंगावरून ओळखायचे. त्यानंतर हे वडे बाहेर काढले जायचे. त्याला ते पहिला घाना, दुसरा घाना, तिसरा घाना असे म्हणायचे. हा तळलेला वडा थेट ग्राहकांचा टेबलावर अल्युमिनियमच्या एका प्लेटमधून जायचा. आणि गरमागरम वडा फुंकून खाता खाता खाणारा अगदी रमून जायचा. या वड्याचा आकारही मोठा म्हणजे दोन वड्याच्या आकाराचा हा एकच वडा. लोक वडा खाऊन तृप्त व्हायचे. वड्याचे जेवढे मिश्रण तेवढेच वडे वाईकर काढायचे. समोर कितीही गिऱ्हाईक असले तरी वडा संपला असे जाहीर करायचे. शिळा वडा अजिबात विकायचा नाही, म्हणजे नाही हे त्यांचे तत्व प्रत्यक्ष कृतीतून पाळायचे.
कोल्हापुरातला दुसरा वडा असाच निवृत्ती चौकातील शिवाजी अर्ध पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला. एका हातगाडीवर हा वडा तयार केला जायचा. चारूचा वडा असे त्याचे नाव. आर. एन. जाधव हे या वड्याची गाडी चालवायचे. घरात तयार केलेला मसाला हे या वड्याचे वैशिष्ट्या. वडा तळायला वडा विकायला जाधव असले तरी त्यांची बायको सरस्वती दगडी पाट्यावर मसाला वाटून तयार करायच्या. आणि जाधव गाडीवर वडा तळायचे. समोर गाडी भोवती खवय्यांची झुंबड असायची.
द्या की लवकर वडा असे काही जण म्हणायचे. वडा तळणारे जाधव त्यांना जसा पाहिजे तेवढा वेळ वडा तळायचे. तसेच वडा द्या, वडा द्या म्हणून घाई करण्राया गिऱ्हाईकावर चिडायचे. त्यांचा हा स्वभाव माहीत असल्यामुळे यांच्या गाडी भोवती खवय्ये गप्प उभारायचे. सायंकाळी पाच वाजता वडा तळायला सुरुवात केली की रात्री नऊपर्यंत ते वडेच तळायचे. त्यांचे चिरंजीव डी. आर. नाना व चारुदत त्यांना मदत करायचे. गेली 52 वर्ष हा वडा निवृत्ती चौकात मिळतो.
आता जाधवांनी गाडी ऐवजी त्याच चौकात एक गाळा घेऊन वड्याची विक्री परंपरा चालू ठेवली आहे. अयोध्या टॉकिजजवळ एका हातगाडीवर दीपक वडा मिळायचा. या वड्यासाठीही मोठी झुंबड उडायची. काळाच्या ओघात वड्याच्या या गाडीची जागा बदलली आणि सीपीआर हॉस्पिटलच्या मागे आली. आज ही या ठिकाणी रांगेत उभे राहून वडा घ्यावा लागतो.
असाच एक वडा शिवाजी युनिव्हर्सिटी परिसरात राजाराम कॉलेजच्या पाठीमागे आहे. शामचा वडा असे त्याचे नाव. कॉलेज विद्यार्थ्यांची या वड्यासाठी तुफान गर्दी. काहींच्या दृष्टीने वडा एक हलका आहार आहे. पण शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेल्या आणि खिशात जेमतेम पैसे असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका वेळच्या जेवणाचा आधार. म्हणून हा वडा खाण्यासाठी येथे गर्दी आहे. आर. माधवन हे चित्रपट अभिनेते कोल्हापुरात शिकायला होते. त्यावेळी ह्या वड्याच्या ते प्रेमातच पडले होते. आजही आर. माधवन यांचे छायाचित्र या वड्याच्या गाडीवर आहे. श्याम सुरवसे हे या वड्याची गाडी चालवतात आणि विद्यार्थ्यांना तृप्त करतात.
इंडिया हॉटेलचा वडा, महापालिकेजवळ तुकाराम वडा, पाटोळे वाडतील झाडाखालचा वडा, गंगावेशीत छकुली वडा, सिद्धार्थ गार्डनमधील शितल वडा, शिंगोशी मार्केट मधला अनेगा वडा. ही वडाविक्रीची ठिकाणे अक्षरश: खवय्यांच्या गर्दीने रोज फुललेली असतात. वड्याच्या चवीत जराही फरक पडणार नाही अशी काळजी वडा विक्रेते घेतात. हॉटेल व्यवसायात कितीही मोठी आर्थिक उलाढाल असली तरी वड्याची उलाढाल म्हणजे एक वेगळेपण आहे. आणि ते केवळ चवीवर जपले गेले आहे.