ओटवणे रवळनाथ मंदिर येथे साकारला प्रशस्त मंडप
भाजपा युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य
ओटवणे प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ओटवणे रवळनाथ मंदिर येथे प्रशस्त मंडप स्वखर्चाने बांधून दिला. त्यामुळे या देवस्थानच्या धार्मिक उत्सवात मंदिर परिसरात मंडप अभावी होणारी गैरसोय दूर होणार आहे. या मंडपाचे लोकार्पण ओटवणे गावच्या प्रसिद्ध दसरोत्सवात शुक्रवारी ११ ऑक्टोबरला होणार आहे.जागृत देवस्थान तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रवळनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. तसेच या देवस्थानच्या सर्व धार्मिक उत्सवांना भाविकांची अलोट असते. मंदिर परिसरात मंडप नसल्यामुळे या देवस्थानच्या धार्मिक उत्सवात पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात भाविकांची गैरसोय होते. गेल्या वर्षी विशाल परब या उत्सवाला आले असता देवस्थानच्या मानकऱ्यांनी मंदिर परिसरात मंडप उभारण्याबाबत त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर परिसरात मंडप उभारण्याची ग्वाही दिली होती. रवळनाथ मंदिर नजिकच्या ऐतिहासिक नगारखाना आणि भक्तनिवास याला लागूनच हा प्रशस्त मंडप साकारण्यात आला आहे. दसऱ्याच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवारी ११ ऑक्टोबरला सायंकाळी या मंडपाचे लोकार्पण विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंडप बांधून दिल्याबद्दल स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रवींद्र गावकर आणि देवस्थानचे सर्व मानकरी यांनी विशाल परब यांचे आभार मानले आहेत.