ऑस्ट्रेलियाला 300 धावांची भक्कम आघाडी
इमाम उल हकचे अर्धशतक, पाक सर्वबाद 271, लियॉनचे 3 बळी
वृत्तसंस्था/ पर्थ
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने 300 धावांची भक्कम आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. पाकचा पहिला डाव 271 धावांत आटोपल्याने ऑस्ट्रेलियाने 216 धावांची भक्कम आघाडी घेतली. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 84 धावा जमवित पाकवर 300 धावांची बढत मिळविली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनला कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ एक बळीची जरूरी आहे.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 487 धावांवर आटोपला. त्यानंतर पाकने 2 बाद 132 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर पाकचा पहिला डाव 101.5 षटकात 271 धावांत आटोपला. त्यांचे शेवटचे 8 गडी 139 धावांची भर घालत तंबूत परतले. पाकचा सलामीचा गोलंदाज इमाम उल हकने एकाकी लढत देत 199 चेंडूत 4 चौकारांसह 62, शफीकने 121 चेंडूत 6 चौकारांसह 42, कर्णधार मसूदने 43 चेंडूत 5 चौकारांसह 30, बाबर आझमने 2 चौकारांसह 21, शकीलने 4 चौकारांसह 28, आगा सलमानने 4 चौकारांसह नाबाद 28 धावा केल्या. पाकच्या पहिल्या डावात 27 अवांत्तर धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 66 धावांत 3, स्टार्कने 68 धावांत 2, कमिन्सने 35 धावांत 2 तर हॅझलवूड, मार्श आणि हेड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपाहारावेळी पाकने 6 बाद 203 धावा जमविल्या होत्या. तर चहापानावेळी पाकचा डाव 271 धावांत आटोपला. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 33 षटकात 2 बाद 84 धावा जमविल्या. उस्मान ख्वाजा 1 चौकारांसह 34 तर स्टीव्ह स्मिथ 1 षटकार आणि 3 चौकारांसह 43 धावावर खेळत आहेत. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 79 धावांची अभेद्य भागिदारी केली. तत्पूर्वी वॉर्नर आणि लाबूसेन हे दोन फलंदाज केवळ 5 धावात बाद झाले. पाकतर्फे खुर्रम शेहजादने 19 धावात 2 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियन संघ पाकवर मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया प. डाव 113.2 षटकात सर्वबाद 487, पाक प. डाव 101.5 षटकात सर्वबाद 271 (इमाम उल हक 62, शफीक 42, मसूद 30, बाबर आझम 21, शकील 28, सलमान नाबाद 28, लियॉन 3-66, स्टार्क 2-68,कमिन्स 2-35, हॅझलवूड 1-49, हेड 1-4), ऑस्ट्रेलिया दु. डाव 33 षटकात 2 बाद 84 (ख्वाजा खेळत आहे 34, स्मिथ खेळत आहे 43, वॉर्नर 0, लाबूसेन 2, खुर्रम शेहजाद 2-19).