ग्राम पंचायतमार्फत कचरा निर्मूलनासाठी ठोस निर्णय
हिंडलगा गावच्या सभोवती कचऱ्यांचे ढीग : परिसरात दुर्गंधी : भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव शहरालगत असलेल्या हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये बरीचशी उपनगरे असून कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोकवस्ती वाढत असून गावात भाडोत्री राहणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. गावात खास कचरा गाडीची व्यवस्था करण्यात आलेली असूनदेखील गावच्या सभोवती कचऱ्यांचे ढीग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामध्ये मुख्य राज्यमार्ग तसेच इतर ठिकाणी कचऱ्यामुळे सभोवती दुर्गंधी पसरलेली असून जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा गाडी ठराविक दिवशी गावातील प्रत्येक गल्लीवार फिरून कचरा गोळा करत असते. त्यामुळे कचऱ्याचे निर्मूलन होत असते, तरीदेखील गावामध्ये मोठ्या प्रमाणात भाडोत्री राहणाऱ्यांची संख्या झाल्यामुळे याचा उपद्रव जनतेला झाला आहे. कारण भाडोत्री लोक रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन ठराविक ठिकाणी कचरा फेकत आहेत. खास करून बॉक्साईट रोड तसेच बेळगाव-सावंतवाडी रोड या ठिकाणी बरेचसे लोक कचरा आणून फेकत असतात.
त्यामुळे कचऱ्यांचे ढीगच ढीग निर्माण झाले आहेत. या ठिकाणच्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढली आहे. यापूर्वी यासाठी ग्रामपंचायतमार्फत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्याचा उपयोग म्हणावा तसा झालेला नाही. सी.सी.टी.व्हीत कचरा टाकणाऱ्यांची छबी कैद झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जर झाली असती तर ही समस्या निर्माण झाली नसती. यापुढे असे न होता कचरा टाकणाऱ्यांचा फोटो मिळताच कायदेशीर पाच हजार रुपये दंड आकारल्यास निश्चितपणे ग्रामपंचायतला यश मिळण्याची शक्यता आहे. यापुढे सर्व जनतेनी तसेच घरमालकांनी याची नोंद घेऊन गावात येणाऱ्या कचरा गाडीत ओला कचरा व सुका कचरा देऊन गाव स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतमार्फत करण्यात आले आहे. यापुढे अशाप्रकारे कचरा टाकणारी व्यक्ती आढळल्यास लागलीच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ग्रा.पं. अध्यक्षा मीनाक्षी हितलमनी यांनी कळविले आहे. सूचनाफलक अनावरणप्रसंगी अध्यक्षा हितलमनी, उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर तसेच कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
कचरा टाकल्यास पाच हजाराचा दंड आकारणार
ग्रामपंचायतमार्फत बऱ्याच वेळेला ग्रामस्थांना सूचना दिल्या जातात. त्याची अमल स्थानिक जनता करत असते. परंतु बाहेरून येऊन राहिलेले लोक, येथील मटण दुकानदार व चिकन दुकानदार तसेच हॉटेल मालक रात्रीचा फायदा घेऊन कचरा रस्त्यावर फेकत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याची साठवण या ठिकाणी होत आहे. या गोष्टीची ग्रामपंचायतीने दखल घेऊन यापुढे अशाप्रकारे कचरा टाकणारी व्यक्ती आढळल्यास पाच हजारचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठराविक ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. प्रामुख्याने बॉक्साईट रोड येथील वनखात्याच्या कार्यालयाजवळ, टी. एल. एम. हॉस्पिटलजवळ तसेच पेट्रोल पंपाजवळ अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो.