‘स्काय बरियल’ करणारा समुदाय
दफन तसेच अग्निसंस्कार न करण्याची प्रथा
जगभरात अनेक धर्म असून त्या सर्व धर्मांच्या वेगवेगळ्या परंपरा आणि प्रथा आहेत. या समुदायांमध्ये लोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया आणि परंपरा देखील असतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाल्यास सर्वसाधारणपणे पार्थिवावर अग्निसंस्कार केले जातात. तर काही धर्मांमध्ये पार्थिव दफन केला जातो. परंतु पारसी समुदायात अत्यंत वेगळी प्रथा आहे. पारसी समुदायात मृत्यूनंतर पार्थिवाला दफन करण्याऐवजी ते टॉवर ऑफ सायलेन्समध्ये ठेवण्यात येते. तर जगात आणखी एका समुदायात अत्यंत वेगळ्याप्रकारे अंत्यसंस्कार केले जातात.
तिबेटमध्ये राहणारा बौद्ध समुदाय स्वत:च्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार स्काय बरीयल अंतर्गत करतात. तिबेटमध्ये एखाद्या बौद्धाचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव पांढऱ्या कापडात गुंडाळून 3-5 दिवसांपर्यंत घरात ठेवले जाते. बौद्ध भिक्षू यादरम्यान धार्मिक पूजेची प्रक्रिया पूर्ण करतात. यामुळे आत्म्याची शुद्धी होते असे त्यांचे मानणे आहे. यानंतर बौद्ध भिक्षू स्काय बरीयल अंतर्गत एक खास तारीख निश्चित करतात.
ज्या दिवशी अंत्यसंस्कार करायचा असतो, त्या दिवशी पार्थिव एखाद्या पर्वतावर घेऊन जातात आणि तेथे एका सपाट जागेवर ते ठेवतात. यानंतर तेथे एक खास प्रकारचा धूर निर्माण केला जातो. त्या धूराच्या गंधाद्वारे गिधाड, कावळे इत्यादी पक्षी आकर्षित होऊन येतात, तेथे एक बरियल मास्टर देखील असतो, जो मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे करतो.
अमेरिकेत बंदी
तिबेटी बौद्धांमध्ये स्काय बरीयलची परंपरा दीर्घकाळापासून चालत आली आह. तर जगाच्या अनेक देशांमध्ये या प्रथेला मान्यता देण्यात आली नाही. अनेक लोक या प्रथेला अत्यंत खराब मानतात. अमेरिकेसमवेत अनेक देशांमध्ये स्काय बरीयलवर बंदी घालण्यात आली आहे. याचमुळे अमेरिकेत एखाद्या तिबेटी बौद्धाचा मृत्यू झाला तर त्याच्या पार्थिवाला स्काय बरीयलसाठी परवाना मिळवत तिबेट येथे आणले जाते.