एकच प्रवासी...आणि हवाईसुंदरी
प्रवाशांची संख्या कमी असल्याने, असलेल्या प्रवाशांची सोय दुसऱ्या विमानात करुन दिली जाईल असे खोटेच आश्वासन देऊन त्या विमानाचे उड्डाण रद्द केल्याची कृती एका विमान कंपनीने आपल्या देशात काही दिवसांपूर्वी केल्याचे वृत्त आपल्यापैकी अनेकांनी वाचलेले आहे. वास्तविक, एकदा प्रवाशाने विमान तिकीट खरेदी केले, की त्याला त्याच्या इच्छित गंतव्यस्थळी घेऊन जाणे हे विमानकंपनीचे उत्तरदायित्व असते. मग प्रवास कितीही लांबचा असो आणि प्रवासी एकच असो, तरीही हे उत्तरदायित्व नाहीसे होत नाही. असाच एक प्रसंग ब्रिटीश एअरवेज या जगप्रसिद्ध विमानप्रवास कंपनीवर काही दिवसांपूर्वी ओढवला होता.
ब्रिटनमधील डर्बी येथील ब्रिटीश नागरीक काई फोरसिथ याने या विमान कंपनीच्या विमानाचे तिकीट काढले. प्रवासाच्या दिवशी तो रीतसर विमानात बसला. पण त्या विमानात अन्य कोणताही प्रवासी नव्हता. त्याचे एकट्याचेच तिकीट खपले होते. त्याच्यासह विमानात केवळ एक हवाईसुंदरी आणि चालकासह इतर कर्मचारीवर्ग होता. अन्य कोणी प्रवासी नसल्याने त्याने काही आसने एकमेकांशी जोडून एक मंचक बनविला. त्यावर झोपून त्याने प्रवास केला. विमानातील हवाई सुंदरीने त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था भरपूर केली. कारण अन्य प्रवासी नव्हतेच. तो सुटीसाठी अमेरिकेला चालला होता. त्यामुळे त्याला बरेच तास असा सुखमय वातावरणात घालविण्याची संधी मिळली होती. विमानाचा कर्मचारीवर्गाची त्याच्याशी मैत्री झाली, कारण त्यांनी दिलेल्या सेवेत तो सोडून कोणीही वाटेकरी नव्हतेच. त्याने नंतर आपला हा अनोखा विमान प्रवास अनुभव प्रसिद्ध केला. लोकांनीही त्याच्या भाग्याचा हेवा करणारे संदेश प्रसिद्ध केले आहेत.