‘महाराष्ट्रनामा’तून घोषणांचा वर्षाव
- मविआकडून सवलतींचा जाहीरनामा प्रसिद्ध : - महिलांना मोफत बस प्रवास, 500 रुपयांत सिलिंडर
प्रतिनिधी / मुंबई
राज्यात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरु असून प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे. याच पार्श्वभूमीवर प्र्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आज महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात अनेक योजना अन् सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करुन कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर भर देण्यात आला आहे.
मुंबई येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये रविवार जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रनामा हा महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आदी प्रमुख उपस्थित होते.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या महाराष्ट्रनाम्यातून महिलांना वर्षाला 6 सिलेंडर 500 ऊपयात दिले जाणार असल्याचे सांगत महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणला जाणार आहे. तसेच मतदारांचा विचार करता 300 युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या ग्राहकांना 100 युनिट मोफत वीज देण्यात येणार असून नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय सरकारच्या विविध विभागातील रिक्त 2.5 लाख जागा भरल्या जाणार तसेच एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल. सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार, सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, खासदार अभिषेक मनु सिंघवी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड उपस्थित हेते.
महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणार : मल्लिकार्जून खर्गे
महाराष्ट्रात सर्व जाती, धर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्या, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या अपेक्षेने पहातात. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो. महाराष्ट्राची निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तऊण, महिलांसाठी महायुतीचे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजप युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले.
मोदी जोपर्यत महाराष्ट्रात येतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ : संजय राऊत ,
महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही. हा जाहिरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यंत महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ, राहिल असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
असा आहे महाराष्ट्रनामा
- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 3 हजार प्रतिमहा
- महिलांना बस प्रवास मोफत
- 6 सिलेंडर 500 रुपयांमध्ये
- महिला मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार
- मुलींसाठी मोफत सर्व्हायकल कॅन्सर लस
- मासिक पाळीच्या दिवसात 2 दिवस ऐच्छिक रजा
- बचत गट सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग
- स्वतंत्र बालकल्याण मंत्रालय स्थापन करणार
- प्रत्येक मुलीला 18 वर्षानंतर 1 लाख रुपये देणार
- शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार.
- पदवीधर व पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4 हजारपर्यंत भत्ता
- राज्य सरकारच्या अडीच लाख जागांसाठी भरतीची प्रक्रिया
- महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार-