भारतीय नौदलाकडून शक्तिप्रदर्शन
8 पाणबुड्यांनी अरबी समुद्रात दाखवून दिले सामर्थ्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाच्या 8 पाणबुड्यांनी अरबी समुद्रात आयोजित एका युद्धाभ्यासात भाग घेतला आहे. पश्चिम समुद्र किनाऱ्यावर पार पडलेल्या या युद्धाभ्यासात 8 पाणबुड्यांनी एकाचवेळी भाग घेत स्वत:च्या सामर्थ्याचे दर्शन घडविले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाइस अॅडमिरल संजय जे. सिंह यांनी युद्धाभ्यासाच्या संचालनाची समीक्षा केली आहे. शक्तिप्रदर्शनाच्या अंतर्गत वाइस अॅडमिरल सिंह यांनी पाणबुडीचा खालील पृष्ठभागही पाहिला आणि पाणबुडी चालकांच्या परंपरेनुसार समुद्राच्या पाण्याची चवही चाखली आहे.
एडनचे आखात, अरबी समुद्र आणि लाल समुद्रात ड्रोनविरोधी, क्षेपणास्त्रविरोधी आणि सागरी चाच्यांच्या हल्ल्यांच्या विरोधात नौदलाच्या मोहिमांना 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त नौदलप्रमुख अॅडमिरल हरि कुमार यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आहे. नौदल अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी सकारात्मक कारवाई जारी ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
क्षेत्रात अव्यवस्थेचा लाभ घेऊ पाहणारे सागरी चाचे एका उद्योगाच्या स्वरुपात पुन्हा सक्रीय झाले आहेत. आम्ही या सागरी चाच्यांना रोखण्यासाठी कारवाई करणार आहोत असे नौदलप्रमुखांनी म्हटले आहे.
ऑपरेशन संकल्पने छोट्या आणि त्वरित मोहिमांसंबंधींची धारणा मोडीत काढली आहे. महासागरांमध्ये सुरक्षा आणि स्थिरता निश्चित करण्यासाठी निरंतर अभियानांची आवश्यकता आहे. ऑपरेशनचा वेग अत्यंत अधिक आहे. आमच्याकडे समुद्राच्या विविध हिस्स्यांमध्ये 11 पाणबुड्या आणि 30 युद्धनौका असून त्या सर्व क्षेत्रांमध्ये रुची सुनिश्चित करत असल्याचे उद्गार अॅडमिरल हरि कुमार यांनी काढले आहेत.