अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठात गोळीबार, 2 ठार : अनेक जखमी
पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध
वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठात गोळीबाराची घटना घडली असून यात कमीतकमी दोन जणांचा मृत्यू झाला तर 8 जखमी झाले आहेत. विद्यापीठात परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला आहे. तर पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी राहण्याचा सल्ला देत पोलिसांनी विद्यापीठ परिसर प्रवेशासाठी बंद केला आहे. हल्लेखोर अद्याप मोकाट असल्याने लोकांना घराचे दरवाजे बंद करणे, मोबाइल सायलेंट ठेवणे आणि पुढील नोटीसपर्यंत बाहेर न पडल्याचा सल्ला ब्राउन युनिव्हर्सिटीने दिला आहे. हल्लेखोर पुरुष होता आणि त्याने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते असे पोलीस उपप्रमुख टिमोथी ओ हारा यांनी सांगितले आहे. बारुस अँडहॉली इमारतीनजीक गोळीबार झाला असून येथेच विद्यापीठाचा स्कूल इंजिनियरिंग आणि भौतिकशास्त्र विभाग आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गोळीबाराच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. एफबीआय घटनास्थळी असून संशयिताला लवकरच ताब्यात घेतले जाईल असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.