महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रब्बी हंगामातील बटाटा लागवडीत कमालीची घट

10:09 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बियाण्यांचे गगनाला भिडलेले दर, खताच्या किमतीत चौपट वाढ, मजुरांची टंचाई, मजुरीमध्ये दुप्पट वाढ, पाणीटंचाई, खराब वातावरणामुळे शेतकरी हैराण

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

बटाटा बियाणांचे गगनाला भिडलेले दर, खताच्या किमतीत झालेली चौपट वाढ, मजुरांची टंचाई आणि त्यांच्या मजुरीमध्ये दुप्पटीने वाढ, खराब वातावरण तर भरणीच्या काळात पाणीटंचाईचे सावट, उत्पादनानंतर मिळणारा दर या सर्व कारणांवरून बेळगाव तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे. रब्बी हंगामातील बटाटा लागवडीत शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगल्याने चालू वर्षीच्या हंगामात कमालीची घट झाली असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. सुगी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उसाच्या तोडणीबरोबरच रब्बी हंगामातील कडधान्य पेरणी याशिवाय इतर पिकांच्या लागवडीसाठी तयारी सुरू आहे. चालूवर्षी खराब वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांची लागवड उशिरा होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये उन्हाळी बटाटा बियाणाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यंदा खरीप हंगामातील बटाटा पीक अति पावसामुळे व खराब वातावरणामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. त्यातच आता उन्हाळी बटाटा बियाणाचा दर आवाक्याबाहेर गेल्याने बटाटा बियाण्यांची खरेदी करून लागवड कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे. त्यामुळे यंदा बटाटा बियाणाच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात बटाटा लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारे बटाटा बियाणे एपीएमसीमधील अडत व्यापाऱ्यांकडून घेतली जातात. मात्र सध्या बटाटा बियाणांचा दर आवाक्याबाहेर गेल्याने बटाटा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

उन्हाळी बटाटा बियाणाचा दर साडेतीन हजारहून पुढे

यंदा खरीप हंगामातील बटाटा उत्पादनात कमालीची घट झाली होती. एपीएमसीमध्ये बटाटा उत्पादनदेखील कमी झाल्याने त्याचा परिणाम बटाटा बियाण्याच्या दरावर झाल्याचे दिसून येत आहे. आता रब्बी हंगामात बटाटा बियाणाचा दर अधिक झाल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत.  उन्हाळी बटाटा बियाणाचा दर साडेतीन हजारहून पुढे गेल्याने तो विकत घेऊन कसा लावावा, या चिंतेत बटाटा उत्पादक आहे. आधीच खरीप हंगामातील बटाटा पीक वाया गेले आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक हतबल झाला आहे. उन्हाळी बटाटा पिकावर उरल्यासरल्या आशा होत्या. मात्र उन्हाळी बटाटा बियाण्याचा दर आवाक्याबाहेर वाढल्याने बटाटा बियाणे कसे खरेदी करावे, या चिंतेत शेतकरी आहे. तालुक्यातील रब्बी हंगामात भाजीपाल्याबरोबरच बटाटा बियाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी बटाटा बियाणाचा दर 1500 ते 2000 च्या दरम्यान असायचा. मात्र यंदा बटाटा बियाणाचा दर तब्बल साडेतीन हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याने बटाटा लागवडीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे.

पश्चिम भागात लागवड मोठ्या प्रमाणात

तालुक्यातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, बेकिनकेरे, सावगाव, कडोली, गुंजेनहट्टी, अलतगा, जाफरवाडी, काकती, होनगा, गौंडवाड, कंग्राळी खुर्द, बेळगुंदी, बाकनूर, सोनोली, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, कावळेवाडी, कर्ले, अतिवाड, बसुर्ते, हिंडलगा, सांवगाव, मंडोळी भागात उन्हाळी बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यावर्षी खराब वातावरण, खतांचे वाढलेले दर, लागवड मजुरी, भांगलण, कीटकनाशक औषधे, पाणी देणे, बटाटे काढणी असा एकंदरीत खर्चाचा ताळमेळ बसणे कठीण असल्याने उत्पादनानंतर मिळणारा दर याची वजाबाकी करता शेतकऱ्यांच्या हातात काय मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे सदर पिकाची लागवड न करता दुसरी पिके घेणे सोयीस्कर असल्याने यावर्षी शेतकरी वर्ग बटाटा पिकापासून थोडा लांबच राहत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

एकूण खर्च-उत्पादनाचा ताळमेळ बसणे अवघड

दरवर्षी उन्हाळी बटाटा बियाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करतो. मात्र यंदा बटाटा बियाणाचे दर वाढल्याने लागवड कशी करावी, हा प्रश्न पडला आहे. बटाटा लागवडीसाठी बियाणाबरोबरच रासायनिक खत, शेणखत, ट्रॅक्टर भाडे, मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे एकूण खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसणे अवघड जाणार आहे. बियाणाचा खर्च वाढल्याने बटाटा लागवड करणे कठीण झाले आहे.

- संभाजी कदम (उचगाव)

खरीप हंगामातील बटाटा बियाणे उगवण्याआधीच खराब

दरवर्षी साधारण 1500 ते 1800 पर्यंत बटाटा बियाणाचा दर असतो. मात्र यंदा बियाणाचा दर अधिक वाढल्याने खरेदी अशक्य आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील इतर बियाणांची पेरणी करावी लागणार आहे. इतका अधिक दर कधी झाला नव्हता. मात्र यंदा प्रथमच बटाटा बियाणाचा दर आवाक्याबाहेर गेल्याने विकत घेणे शक्य नाही. आधीच खरीप हंगामातील बटाटा बियाणे उगवण्याआधीच खराब झाली होती. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली होती. त्यामुळे फटका बसला आहे. तर आता बियाणाचे दर वाढल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

- शंकर पाटील (उचगाव)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article