विंडीजच्या डावाला डळमळीत सुरूवात
वृत्तसंस्था/बर्मिंगहॅम
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या शेवटच्या कसोटीत विंडीजच्या पहिल्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. चहापानापर्यंत विंडीजने पहिल्या डावात पाच बाद 194 धावा जमविल्या होत्या.
या मालिकेत इंग्लंडने पहिले सलग दोन सामने जिंकून मालिका हस्तगत केली आहे. या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ब्रेथवेट व लुईस यांनी सलामीच्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केल्यानंतर त्यांची मधली फळी कोलमडली. त्यानंतर विंडीजचे 4 फलंदाज 39 धावांत गारद झाले. होल्डर आणि डिसिल्वा यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला.
ब्रेथवेटने 86 चेंडूत 8 चौकारांसह 61 धावा जमविल्या. उपाहारापर्यंत विंडीजने 26 षटकात 3 बाद 97 धावा जमविल्या होत्या. ब्रेथवेटने आपले अर्धशतक 70 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने झळकविले. लुईसने 61 चेंडूत 4 चौकारांसह 26 धावा जमविल्या. अॅटकिनसनने त्याला झेलबाद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला मॅकेंझी वूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 3 चौकारांसह 12 धावा केल्या. अॅटकिनसनने विंडीजला आणखी एक धक्का देताना अॅथनेझचा 2 धावांवर त्रिफळा उडविला. वोक्सने हॉजला त्रिफळाचित केले. त्याने 11 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजचे शतक 159 चेंडूत फलकावर लागले. होल्डर आणि डिसिल्वा यांनी सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला असून या जोडीने चहापानापर्यंत सहाव्या गड्यासाठी अभेद्य 79 धावांची भागिदारी केली. चहापानावेळी होल्डर 1 षटकार आणि 5 चौकारांसह 42 तर डिसिल्वा 2 चौकारांसह 35 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे अॅटकिनसन आणि वूड यांनी प्रत्येकी 2 तर वोक्सने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव- चहापानापर्यंत 53 षटकात 5 बाद 194 (ब्रेथवेट 61, लुईस 26, मॅकेंझी 12, अॅथनेझ 2, हॉज 13, होल्डर खेळत आहे 42, डिसिल्वा खेळत आहे 35, अवांतर 3, अॅटकिनसन 2-49, वूड 2-36, वोक्स 1-44)