महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चाकूहल्ल्यासह अप्रिय घटनांची मालिका

11:37 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ठिकठिकाणी हाणामारीच्या घटना : गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट : डीजेच्या तालावर नाचताना धक्काबुक्कीमुळे घडले प्रकार

Advertisement

बेळगाव : हाणामारी, चाकूहल्ला व ट्रॅक्टर अंगावर जाऊन गणेशभक्ताचा मृत्यू आदी घटनांमुळे श्री विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. मंगळवारी मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलसमोर झालेल्या चाकूहल्ल्यात तीन तरुण जखमी झाले आहेत. तर बुधवारी सकाळी कपिलेश्वर उड्डाणपुलावर ट्रॅक्टर अंगावर जाऊन एका गणेशभक्ताचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या गणेशचतुर्थीच्या आधीपासूनच सुरू झालेल्या आगमन सोहळ्यांमुळे शहर व उपनगरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. चतुर्थीपासून अनंतचतुर्दशीपर्यंत गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या अप्रिय घटनांच्या मालिकेमुळे मिरवणुकीला गालबोट लागले आहे. गणेशोत्सवाच्या आधी पोलीस स्थानकनिहाय शांतता समितींची बैठक घेऊन मंडळांनी काय करावे, काय करू नये, याविषयी प्रशासनाने मार्गदर्शन केले होते. खासकरून डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, अनेक गणेश मंडळांनी आपल्या श्रीमूर्तीसमोर डीजे लावला होता. डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीनंतर तिघा जणांवर चाकूहल्ला करण्यात आला आहे.

प्रवीण बसवराज गुड्ड्याप्पगोळ (वय 23) रा. बुड्रेनूर, दर्शन मल्लिकार्जुन पाटील (वय 20) रा. यल्लापूर, सतीश रामाप्पा पुजारी (वय 24) रा. हिडकल डॅम अशी चाकूहल्ल्यातील जखमींची नावे असून हे तिघेही शिक्षणासाठी बेळगावला आले आहेत. प्रवीण हा गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. उर्वरित दोघा जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

मंगळवारी मध्यरात्री काकतीवेस रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर डीजेच्या तालावर नाचताना तरुणांच्या दोन गटात धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर तीन तरुण मिरवणुकीतून बाहेर पडले. आपल्या खोलीवर पोहोचण्यासाठी ते निघाले होते. सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापर्यंत ते पोहोचले होते. पाठीमागून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना अडवून चाकूहल्ला केला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सूरज (वय 21) रा. कंग्राळी बी.के. याच्यासह काकती व वैभवनगर येथील दोन अल्पवयीनांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिरवणुकीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हाणामारीच्याही घटना घडल्या आहेत. पहाटे 3 वा. खडेबाजार पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर विवेकानंद पाटील (वय 21) रा. बोकनूर, जोतिबा मुरकुटे (वय 24) या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. तर कोनवाळ गल्ली परिसरात चैतन्य (वय 18) या तरुणाला पहाटे चार वाजता मारहाण झाली आहे. या जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. उप्पार गल्ली, खासबाग येथे मुष्टीने हल्ला केल्याने यश दलभंजन (वय 20) हा तरुण जखमी झाला आहे.

फटाके उडविताना बालक जखमी

फटाके उडविताना एक बालक जखमी झाला. मंगळवारी रात्री मुचंडी, ता. बेळगाव येथे ही घटना घडली आहे. परशुराम बसरीकट्टी (वय 12) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

चाकूहल्ला वैयक्तिक कारणातून

चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर मध्यरात्री पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी ही घटना वैयक्तिक कारणातून झाल्याचे सांगितले आहे. याआधीही विद्यार्थ्यांच्या दोन गटात भांडण झाले होते. मिरवणुकीत त्याचे पर्यवसान उमटले. तिघा जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री एपीएमसीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची आदी अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी तरुणांकडून घटनेची माहिती घेतली.

अष्टे येथील दोन तरुणांना मारहाण

डीजेच्या गाण्यावरून अष्टे येथील दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री कलखांब येथे ही घटना घडली आहे. श्रीधर पाटील (वय 25), नागराज पाटील (वय 20) दोघेही रा. अष्टे अशी जखमींची नावे आहेत. श्री विसर्जन मिरवणुकीत काही जणांनी गाणी लावण्याची सूचना केली. कार्यकर्त्यांनी ती लावलीही. कणबर्गी येथे श्रीमूर्तीचे विसर्जन करून गावी परतताना कलखांबजवळ श्रीधर व नागराज या दोघांना अडवून पाईप व बेल्टने मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article