शहर-उपनगरात दुकाने फोडण्याची मालिका
पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्लीसह मार्केट यार्डमध्ये चोरट्यांचा उच्छाद : रोकड-दागिने लांबविले
बेळगाव : शहर व उपनगरात गुरुवारी पहाटे चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला. मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली परिसरात पाच दुकाने फोडण्यात आली आहेत. तर मार्केट यार्ड येथे तीन दुकाने फोडण्यात आली आहेत. चोरीच्या या घटनांनी एकच खळबळ माजली आहे. काही दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली आहे. या बहुतेक घटनांत चोरट्यांच्या हाती म्हणावे तसे काही लागले नाही. गल्ल्यातील चिल्लर रक्कम, चांदीचे पैंजण चोरट्यांनी पळविले आहेत. पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिराजवळच असलेल्या आर्यन सारीजची दोन दुकाने फोडण्यात आली आहेत.
एका दुकानातून सुमारे दहा हजार रुपये रोकड तर दुसऱ्या दुकानातून दहा तोळे चांदीचे पैंजण चोरट्यांनी पळविले आहेत. पांगुळ गल्ली येथील हिंदुस्थान ट्रेडिंग या दुकानाचे शटर उचकटून किमती ऐवजासाठी चोरट्यांनी शोधाशोध केली आहे. या बॅगच्या दुकानात त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पांगुळ गल्ली येथील तीन दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा टेंगिनकेरा गल्लीकडे वळविला. दिव्यशक्ती इलेक्ट्रिकल्सचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कामत गल्ली येथील पद्म फूटवेअरचे गोदाम फोडण्यात आले आहे. रस्त्याच्या एका बाजूला गोदाम आहे तर दुसऱ्या बाजूला दुकान आहे.
गोदामाचे शटर उचकटून गल्ल्यात शोधाशोध करण्यात आली आहे. पांगुळ गल्ली, टेंगिनकेरा गल्ली व कामत गल्ली परिसरात पाच दुकाने फोडण्यात आली असून पहाटे 4 ते 5 यावेळेत या घटना घडल्या आहेत. पहाटे फिरायला जाणाऱ्या काही जणांनी चोरट्यांना पाहिले. मात्र, कोणीच त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला नाही. अंगावर जाकिट घालून आलेल्या तीन ते चार चोरट्यांनी सर्व पाच दुकानांची शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आहे. गुरुवारी सकाळी आपली दुकाने उघडण्यासाठी आलेल्या मालकांना धक्का बसला. मध्यवर्ती भागातील दुकाने चोरट्यांनी लक्ष्य बनविल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
मार्केट यार्ड परिसरातील तीन दुकाने फोडली
मार्केट यार्ड परिसरातील तीन दुकाने फोडण्यात आली आहेत. श्री गणेश एंटरप्रायझेस या खाद्यतेलाच्या दुकानाचे शटर उचकटण्यात आले आहे. यासंबंधी राजेश जांभळे यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या दुकानापासून जवळच असलेल्या मे. आय. एन. गडद या खताच्या दुकानाचे शटर उचकटून रोकड व ऐवजासाठी शोधाशोध करण्यात आली आहे. तेथून जवळच असलेल्या कृष्णा कृषी केंद्राचे शटर उचकटून गल्ल्यातील सुमारे 8 ते 10 हजार रुपये चोरट्यांनी पळविले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची छबी कैद
मार्केट यार्ड व मध्यवर्ती भागात चोरी झालेल्या आठपैकी काही दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली आहे. बहुतेक गुन्हेगारांनी जाकिट व टोपी घातली होती. मार्केट यार्डमधील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार स्पष्टपणे रेकॉर्ड झाला आहे. कृष्णा कृषी केंद्राचे शटर फोडताना तिघा जणांची छबी टिपली गेली आहे. शटर उचकटून दोघेजण बाहेरच थांबतात तर एकटा दुकानात शिरतानाचे फुटेज उपलब्ध झाले आहे. एपीएमसी पोलिसांनी मार्केट यार्डमधील तिन्ही दुकानांना भेटी देऊन पाहणी केली आहे.