राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना दुसरी नोटीस शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर शहरविकास प्राधिकारमध्ये (मुडा) झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्याचा पुढाकार घेतला आहे. यापूर्वीच्या कारणे दाखवा नोटीसला राज्य सरकारने दिलेले उत्तर पुरेसे नसल्याचा आक्षेप घेऊन राज्यपाल दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्मयता असल्याची माहिती आहे. सरकारच्यावतीने मुख्य सचिवांनी दिलेले उत्तर आणि खटल्यात बरीच तफावत आहे. त्यामुळे आणखी एक कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा सल्ला कायदेतज्ञांनी राज्यपालांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी दिल्लीहून परतलेल्या राज्यपालांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी दिलेल्या उत्तराबाबत कायदेतज्ञांकडून माहिती घेतली आहे. या प्रकरणाचा बचाव करताना सरकारने सिद्धरामय्या यांना संरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचा सल्ला कायदेतज्ञांनी दिला आहे.