दु:खदायी समर प्रसंग
महाराष्ट्राच्या राजकारणाला जे विचित्र वळण लागले आहे त्याचाच पुढचा अंक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत बाप विरुद्ध लेक, पतीविरुद्ध पत्नी, चुलत्या विरुद्ध पुतण्या अशा रक्ताच्या नात्यांची सत्वपरीक्षा बघणाऱ्या लढती होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत नणंद आणि भावजयीची बारामतीत झालेली लढत खूपच गाजली होती. त्या काळात जोशात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लोकांना भावनिक केले जाईल, अश्रू ढाळले जातील तुम्ही त्या प्रकाराला भुलू नका असे भाषण केले होते. ही निवडणूक खूपच गाजली. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बारामतीचे लोक अजित पवार यांना मानत होते. मात्र तरीसुद्धा त्यांनी शरद पवार यांच्या बाजूने झुकत सुप्रिया सुळे यांना विजयी केले. हा दादांच्यासाठी एक मोठा धक्का होता. विशेष म्हणजे त्यानंतर विधानसभा निवडणूक लागताना अजितदादांनी बारामतीत पत्नीला लढवणे ही आपली चूक होती असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामागे एक मार्केटिंग कंपनी असल्याची चर्चा झाली. दादांच्यासारखा व्यक्ती अशा प्रकारे थेट कबुली देऊ शकतो. यामागे मार्केटिंग पॉलिसी होती असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. मात्र आपण भावनिक नाही असे दाखवण्याचा दादांचा प्रयत्न त्यांना मोक्याच्या क्षणी धोक्यात टाकतो हे सोमवारी दिसून आले. बारामतीत कणेरी येथील मारुतीच्या साक्षीने प्रचार शुभारंभ करताना दादांचा कंठ दाटून आला. लोकांना भावनिक होऊ नका असे म्हणणारे ते दादा हेच का? असाही प्रश्न निर्माण झाला. पुतणे युगेंद्र पवार यांच्या विरोधात होणारी लढत दादांना अस्वस्थ करणारी ठरली आणि त्यांनी आपल्या मातेला ही लढत नको होती असे वक्तव्य केले. तर त्यांची सभा होताच बंधू श्रीनिवास पवार यांनी, आईने असे काहीही म्हटलेले नाही असा खुलासा करून दादांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या घरातील ही भाऊबंदकी गेल्या काही दिवसात बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. गेल्या काही वर्षात ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी महाराष्ट्राने अनुभवली आहे. बाळासाहेबांच्या पश्चात दोन्ही बांधवांना एकत्र येण्याचे अनेकांचे प्रयत्न फसले. आता त्यांच्यातील राजकारण एका टोकाला पोहोचले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या रत्नागिरी सिंधुदुर्गमधून पराभवासाठी राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन दाखवली. एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा ते वेळोवेळी धावून गेले. आता भाजप त्यांच्या मुलासाठी धावून येण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत्या पुतण्यामधील मतभेद, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची लढाई हे महाराष्ट्राने अशाच दु:खी अंतकरणाने पाहिले. छत्रपती संभाजीनगर जिह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार झालेले हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात सध्या त्यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्या माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या कन्या असून मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला गेल्याने त्यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला. 2019 सालापासून विभक्त असणारे हे प्रतिस्पर्धी आता निवडणुकीच्या मैदानात लोकांचे प्रश्न मांडणार की आपल्या घरातली भांडणे सांगणार? हा प्रश्नच आहे. विधानसभा निवडणुकीत बापा विरुद्ध मुलगी सुद्धा लढणार आहे. लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी राजे छत्रपती यांच्यात लढत व्हावी असा देखील कुटील डाव काही मंडळींनी टाकून पाहिला होता. मात्र योग्य वेळी संभाजीराजे यांनी संयमाची भूमिका घेतली आणि कोल्हापूरचा छत्रपती घराण्यातील ही नामुष्कीजनक घटना टळली. गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यात छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद आहेत. दोघांच्या गटांमध्ये प्रत्येक निवडणुकीत होणाऱ्या हाणामाऱ्या गेल्या काही दिवसात शांततेत परावर्तित झाल्या आहेत. प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांचे सण, उत्सव जेलमध्ये किंवा अटक टाळण्यासाठी घर सोडून गायब व्हायचे हा इथला शिरस्ता होता. मात्र या दोघांच्या मनोमिलनाने तूर्तास तरी लोक सुखी, समाधानी आहेत. नेतृत्व करणाऱ्या घराण्यांमध्ये वाढत जाणारी सत्ता स्पर्धा, त्या स्पर्धेतून वैयक्तिक संबंध सुद्धा दुरावत जात असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात मोठे भावनिक तिढे निर्माण झालेले आहेत. कधीकाळी राज ठाकरे यांच्याबाबत हळवे होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना कर्तव्यकठोर झालेले आणि माझे छायाचित्र, नाव वापरू नको असे सांगितलेले महाराष्ट्राने पाहिले आहे. आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे असे भावनिक होऊन सांगणाऱ्या राज ठाकरे यांना टोकाची टीका करताना तर त्यांची खिल्ली उडवताना उद्धव ठाकरेंना पाहिले आहे. सध्या कर्तव्यकठोर होण्याची वेळ शरद पवारांच्या वर आलेली आहे. राजकारणात वेळोवेळी त्यांनी आपल्या कठोर निर्णयांचा प्रत्यय आणून दिलेला आहे. अनेक वेळा अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहिलेले शरद पवार पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्यासमोर उभे आहेत आणि आपण जिद्दीने लढतोय हे दाखवून देण्यासाठी न्यायालयापासून सभेच्या मैदानावर सुद्धा ते एकट्याने उभे असलेले दिसत आहेत. अशा स्थितीत पवार यांची आजची झालेली सभा महाराष्ट्रातील राजकारण्यांना विचार करायला लावणारी आहे. राजकारणासाठी नाती पणाला लावली गेली तर काय होते ते महाराष्ट्राच्या कानाकोप्रयात निवडणुकीच्या रणांगणात दिसते आहे. लढण्याचे कर्तव्य प्रत्येकाला पार पाडायचे आहे आणि समोर कोण आहे याची तमा बाळगायची नाही. ही वाक्ये महाकाव्यासाठी शोभून दिसतात. प्रत्यक्षातील जीवनात यामुळे होणारी होरपळ खूप मोठी असते. त्याचे परिणाम ही खूप दूरगामी असतात. महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांमध्ये सुरू असणारे हे वाद घराघरात घुसू पाहत आहेत. नेत्यांवर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते यामध्ये होरपळून निघत आहेत. अशा लढाया नेत्यांना शोभत असल्या तरी कार्यकर्त्यांना परवडणाऱ्या नसतात. शेवटी दगड धोंड्यांना, कोर्टबाजी आणि खटल्यांना सामोरे जाण्याची वेळ कार्यकर्त्यांवर येत असते. घटना क्षणात घडून जाते आणि त्याविषयीचे खटले वर्षानुवर्षेत छळत राहतात. त्यातून अनेकांची सुटका मृत्यू आला तरी होत नाही. दुर्दैवाची वेळ आता थांबली पाहिजे. नेत्यांनीच याचा विचार केला पाहिजे.