धावती स्पोर्ट्स मोटारसायकल आगीत खाक
कारवार : धावत्या स्पोर्ट्स मोटारसायकलीला आग लागल्याची घटना आज गुरुवारी कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमदक्की येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर घडली. या घटनेत मोटारसायकलस्वार शावेश बचावला. तथापि मोटारसायकल मात्र जळून खाक झाली. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी उत्तरप्रदेशमधील शावेशसह अन्य तिघेजण स्पोर्ट्स जावा मोटारसायकलवरून दक्षिण भारताच्या प्रवासाला गेले होते. काल बुधवारी त्यांनी मुर्डेश्वर येथे मुक्काम ठोकला व गुरुवारी ते गोव्याच्या दिशेने निघाले होते.
प्रसंगावधान राखले पण...
सर्वजण कारवार तालुक्यातील अमदळ्ळी येथे दाखल झाले असताना शावेश याच्या मोटारसायकलीमधून धूर येत असल्याचे पाठीमागून येणाऱ्या युवकाला दिसून आले. तातडीने त्याने ही माहिती त्याने शावेशला दिली. शावेशने मोटारसायकल थांबविली व बाजूला झाला. तोपर्यंत मोटारसायकलीने पेट घेतला आणि जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कारवारहून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्पोर्ट्स मोटारसाकलीचा खेळ संपला होता. या दुर्घटनेमुळे शावेश याची लाखो रुपयांची हानी झाली आहे. कारवार ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.