टेस्ला कंपनीच्या प्रकल्पात रोबोटचा माणसावर हल्ला
ह्युस्टन : अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एलन मस्क यांची कार कंपनी टेस्लाचा प्रकल्प आहे. याच प्रकल्पात एका इंजिनियरवर रोबोटने हल्ला केला आहे. स्वत:च्या सहकाऱ्यासोबत घडलेला प्रकार पाहून दोन कर्मचारी घाबरून गेले. तर अॅल्युमिनियम कारच्या हिस्स्यांना पकडण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या रोबोटने हा हल्ला केला आहे. तिघे कर्मचारी अन्य रोबोटसाठी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग करत असताना रोबोटने एका कर्मचाऱ्याला पकडले होते. रोबोटच्या धातूयुक्त पंज्याने कर्मचाऱ्याच्या पाठीवर वार झाले आहेत. अन्य कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी बटन दाबून या रोबोटला रोखले आहे. या घटनेचा खुलासा टॅव्हिस काउंटी आणि संघीय नियामकांना सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे झाला आहे. अलिकडच्या काळात रोबोटमुळे निर्माण झालेली जोखिम वाढलेली असताना ही घटना समोर आली आहे. अनेक कंपन्यांमध्ये रोबोटमुळे कर्मचाऱ्यांना होणारी ईजा चिंतेचा विषय ठरली आहे.