मंगळ ग्रहावर वाहत होती नदी
वैज्ञानिकांना मिळाले 15 हजार किमी लांब प्राचीन जलप्रवाहाचे पुरावे
मंगळाला आतापर्यंत एक कोरडा अन् थंड ग्रह मानले जात होते, परंतु एका नव्या शोधाने हा विचार पूर्णपणे बदलला आहे. वैज्ञानिकांनी मंगळ ग्रहाच्या दक्षिण हिस्सा नोआचीस टेरामध्ये 15 हजार किलोमीटर लांब प्राचीन नदी प्रणालीची ओळख पटविली आहे. हा जलप्रवाह गंगा नदीपेक्षाही लांब आहे. या चकित करणाऱ्या शोधाने वैज्ञानिक अचंबित झाले आहेत. तसेच मंगळ ग्रहावर जीवसृष्टीच्या शक्यतांना पुन्हा चर्चेत आणले आहे. हा शोध ब्रिटनच्या ओपन युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक एडम लोसेकूट यांच्या नेतृत्वात करण्यात आला. त्यांच्या अध्ययनाला रॉयल अॅस्ट्रोनॉमी सोसायटीच्या नॅशनल अॅस्ट्रोनॉमी मीटिंग 2025 मध्ये सादर करण्यात आले.संशोधकांनी सीटीएक्स, मोला आणि हायराइज यासारख्या हाय-रिझोल्युशन ऑर्बिटल इंस्ट्रूमेंट्सच्या मदतीने मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर या प्राचीन नदी प्रवाहांचे लोकेशन, लांबी आणि आकाराचा नकाशा तयार केला आहे. हे प्रवाह प्रत्यक्षात ‘इनवर्टेड चॅनेल्स’ किंवा ‘फ्लूवायल सायनोयस रिजेस’ आहेत. ज्या कधी वाहत्या नद्यांच्या तळाला जमलेल्या गाळामुळे निर्माण झाल्या होत्या. कालौघात आसपासच्या मातीची धूप झाली आणि हे दगड नदीच्या पृष्ठभागावर आले.
अध्ययनात काय कळले?
काही नद्यांची लांबी शेकडो किलोमीटर आहे आणि ते पृष्ठभागापेक्षा अनेक मीटर उंच आहेत. यातून मंगळावर पाणी दीर्घकाळापर्यंत आणि मोठ्या क्षेत्रात वाहत होते असे संकेत मिळतात. पाण्याचा स्रोत बहुधा पाऊस असावा, यातून त्या काळात मंगळावर स्थिर आणि आर्द्र हवामान राहिल्याचे कळते. सुमारे 3.7 अब्ज वर्षांपूर्वी नोआशियनहून हेस्पेरियन युगात परिवर्तन होत होते.
हा शोध मंगळ ग्रहावर स्थायी जलप्रणाली आणि अनुकूल हवामानाच्या दिशेने इशारा करतो. हे घटक जीवनासाठी आवश्यक मानले जातात. यापूर्वी मंगळावर बर्फ कधीकधी वितळत होता आणि त्यामुळे काही काळासाठी पाणी वाहत होते असे मानले जात होते. परंतु आता तेथे दीर्घकाळापर्यंत वाहत्या नद्यांचे एक जाळे अस्तित्वात होते असे वाटत आहे. नोआचीस टेरा सारखा भाग मंगळावर आजही अब्जावधी वर्षे जुना आहे आणि कुठल्याही बदलाशिवाय अस्तित्वात आहे. हे एक असे टाइम कॅप्सूल आहे, जे पृथ्वीवर कधी मिळणार नाही असे संशोधक एडम लोसेकूट यांनी सांगितले. हा शोध केवळ मंगळाच्या इतिहासाबद्दल नवा दृष्टीकोन देणारा नसून अखेर मंगळाचे हवामान इतक्या वेगाने कसे बदलले, असा प्रश्नही उपस्थित करणारा आहे. मंगळावर कधी काळी जीवन होते का? भविष्यात वस्ती निर्माण करण्याजोगी जागा तेथे मिळू शकते का? या प्रश्नांची उत्तरे सध्या मिळणार नाहीत.