क्रिकेटमध्ये ‘टेस्ट ट्वेंटी’चा क्रांतिकारी प्रकार दाखल
वृत्तसंस्था/ दुबई
टेस्ट ट्वेंटी या क्रांतिकारी 80 षटकांच्या स्वरूपाच्या जागतिक स्तरावर सादरीकरणासह क्रिकेटने त्याच्या उक्रांतीत आणखी एक महत्त्वाचा क्षण पाहिला आहे. हा प्रकार कसोटी क्रिकेटच्या धोरणात्मक समृद्धीला टी-20 च्या उत्साहाशी जोडतो. दि वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष, क्रीडा उद्योजक गौरव बहिरवाणी यांनी ही नवीन संकल्पना मांडलेली असून हा प्रकार क्रिकेटमधील महान खेळाडूंची पिढी शोधून काढून त्यांचे यश साजरे करण्याचा आणि खेळाच्या पारंपरिक भावनेची सांगड नाविन्यपूर्णतेशी घालण्याचा हेतू बाळगतो.
यात 80 षटकांचा एक सामना असेल आणि प्रत्येक संघासाठी 20 षटकांचे दोन डाव असतील. टेस्ट ट्वेंटी कसोटी क्रिकेटचा सार एका दिवसात आणते. या प्रकारात पारंपरिक निकाल (विजय, पराभव, बरोबरी किंवा अनिर्णित) कायम ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात वेगवान आणि सामन्याच्या प्रसारणास अनुकूल खेळ सुनिश्चित होईल, जो धोरणात्मक खोली आणि खेळाडूंच्या कौशल्याला वाव देईल.
जागतिक स्तरावर हा प्रकार सादर करण्याच्या कार्यक्रमात बोलताना गौरव बहिरवाणी म्हणाले की, ही आणखी एक लीग नाही, ही क्रिकेटच्या भावनेला मानवंदना आहे. टेस्ट ट्वेंटी खेळाचा वारसा जपते आणि त्याच्या भविष्याला आकार देते, असे त्यांनी सांगितले. टेस्ट ट्वेंटी सल्लागार मंडळात खेळाच्या चार सर्वांत प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. ही नावे ए. बी. डिव्हिलियर्स, सर क्लाईव्ह लॉईड, मॅथ्यू हेडन आणि हरभजन सिंग अशी असून क्रिकेटने त्याच्या पायाशी प्रामाणिक राहून विकसित झाले पाहिजे या विश्वासाने ते एकत्र आले आहेत.
आपले विचार मांडताना सल्लागार मंडळाचे सदस्य डिव्हिलियर्स म्हणाले की, टेस्ट ट्वेंटी हा हेतुपुरस्सर आणलेला नाविन्यपूर्ण प्रकार आहे. ही संकल्पना भविष्यातील शक्यतांना स्वीकारताना खेळाच्या परंपरांचा आदर करते. ती तऊण खेळाडूंना पाठलाग करण्यासाठी एक नवीन स्वप्न देते आणि चाहत्यांना अनुसरण्यासाठी एक नवीन कहाणी देते.
टेस्ट ट्वेंटी ही जागतिक प्रतिभेला चालना देणारी संकल्पना असून 13 ते 19 वयोगटातील खेळाडूंसाठी तिची रचना केलेली आहे. पहिला टेस्ट ट्वेंटी हंगाम जानेवारी, 2026 मध्ये सुरू होईल, ज्यामध्ये सहा जागतिक संघांचा समावेश असेल. त्यापैकी तीन भारतीय शहरांवर आधारित संघ आणि तीन आंतरराष्ट्रीय संघ (दुबई, लंडन आणि एक अमेरिकेतील) असतील. प्रत्येक 16 खेळाडूंच्या संघात आठ भारतीय आणि आठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असेल, ज्यामुळे स्थानिक आणि जागतिक प्रतिभेचे मिश्रण साधले जाईल. यासंदर्भात 13 ते 19 वयोगटातील क्रिकेटपटूंसाठी ऑनलाईन नोंदणी 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 पासून सुरू झाली आहे.