विसर्जन तलावाच्या स्वच्छतेचा महामंडळाकडून आढावा
देवीदेवतांचे फोटो व्हायरल न करण्याचे आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने रविवारी कपिलेश्वर विसर्जन तलावाची पाहणी करण्यात आली. विसर्जनानंतर परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने विसर्जन तलावाची लवकर स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामंडळाने भेट देऊन महापालिकेकडून सुरू असलेल्या स्वच्छतेचा आढावा घेतला. कपिलेश्वर जुना तलाव स्वच्छ करण्यात आला असून नवीन तलावातील स्वच्छता मोहीम अंतिम टप्प्यात आहे. काही नागरिकांनी मूर्तींचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. परंतु जबाबदार नागरिकांनी असे फोटो व्हायरल करू नये, असे आवाहन मंडळाच्यावतीने केले आहे. व्हिडिओ चित्रिकरण करून देवदेवतांची विटंबना केली जात असल्याने असे प्रकार थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्यकारी सचिव आनंद आपटेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला.