बिनभाड्याचा ‘मालक’
सर्वसाधारणपणे हॉटेलात तीन-चार दिवस किंवा फारतर एक आठवडा वास्तव्य करण्याची पद्धत आहे. काही लोक काही विशिष्ट कारणास्तव किंवा मोठा व्यवहार करावयाचा असल्यास महिना-दोन महिनेही एका हॉटेलात वास्तव्य करतात. तथापि, अमेरिकेत एक व्यक्ती अशी निघाली की, जिने एका हॉटेलात तब्बल पाच वर्षे वास्तव्य केले. तेही चक्क न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार.
हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तथापि, ही घटना खरी आहे. या व्यक्तीचे नाव मिकी बेरेटो असे आहे. त्याचे वय 48 वर्षे असून तो न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागातील एका अलिशान हॉटेलात उणीपुरी पाच वर्षे विनामूल्य वास्तव्य करुन होता. इतकेच नव्हे, तर आपणच या हॉटेलचे मालक आहोत, अशी बतावणी त्याने यशस्वीरित्या करुन हॉटेलच्या कर्मचारीवर्गावर प्रभाव पाडला होता. अखेर गेल्या बुधवारी त्याचे बिंग बाहेर पडले आणि त्याला अटक करण्यात आली आहे. पण त्याने हे साध्य कसे केले, हा चर्चेचा विषय झाला आहे.
तर ही कथा अशी आहे, की मिकी बेरेटो हा व्यक्ती लॉस एंजल्समध्ये रहात होता. त्याने न्यूयॉर्क येथे वास्तव्यास येण्याआधी काही दिवस तेथील ‘आर्ट डेको न्यूर्यार्कर’ नामक हॉटेलात 200 डॉलर्स भरुन खोली नोंद केली. हे हॉटेल 1930 मध्ये निर्माण करण्यात आले होते. न्यूयॉर्क मधील एका नियमानुसार 1969 पूर्वी निर्माण झालेल्या एखाद्या इमारतीतील एका खोलीत कोणी रहात असेल तर तो ती खोली 6 महिन्यांसाठी भाड्याने घेऊ शकतो. त्यामुळे बेरेटो याने हॉटेल व्यवस्थापनाकडे सहा महिन्याच्या वास्तव्यासाठी अर्ज केला. त्याचा अर्ज मान्य झाला नाही. त्यामुळे त्याने न्यायालयात अभियोग सादर केला. त्यात त्याचा विजय झाला आणि न्यायालयाने त्याला खोली देण्याचा आदेश दिला. त्यामुळे तो तब्बल पाच वर्षे खोलीभाडे न देता त्या हॉटेलात राहिला. या यशामुळे त्याची हाव वाढली. त्याने बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती इंटरनेटवर अपलोड करुन आपणच या हॉटेलचा मालक असल्याचे भासविले. अखेर हा सर्व प्रकार बाहेर आला.