अमावस्येला होणार भाविकांचा विक्रम
कुंभमेळ्यासाठी येणार 10 कोटीहून अधिक भक्त
वृत्तसंस्था / प्रयागराज
मौनी अमावस्येला, अर्थात आज बुधवारी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात भाविकांच्या संख्येचा विक्रम होणार आहे. हे या कुंभभेळ्यातील द्वितीय ‘अमृत स्नान’ आहे. त्यामुळे देशभरातून आणि विदेशांमधूनही एकंदर 10 कोटींहून अधिक भाविक या एकाच दिवसात या महापर्वणीत सहभागी होतील, अशी शक्यता आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने सुरक्षा आणि सुविधा यांची सर्व सज्जता केली आहे.
आतापर्यंत महाकुंभमेळ्यात एकंदर 15 कोटी भाविक सहभागी झाले आहेत. अमावस्येच्या दिवशी ही संख्या 25 कोटींपर्यंत किंवा त्याहीपेक्षा अधिक पातळीवर पोहचणार आहे. हा आजवरच्या इतिहासातील विक्रम असू शकेल, असे तज्ञांचे अनुमान आहे. सर्व भाविकांचे स्वागत करण्यास प्रयागराज सज्ज आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक विभागाला दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे.
सहस्रावधी हेक्टरवर विस्तार
अमावस्येदिवशीचे स्नान हे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे भाविकांची संख्या प्रचंड असते. यावेळी ती आतापर्यंतची सर्वाधिक असेल, असे मानले जात आहे. प्रयागराज येथील संगम क्षेत्रावर सहस्रावधी हेक्टर्सवर भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या क्षेत्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून महाकुंभातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. 20 हजारांहून अधिक सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदूंसाठी पवित्र असणाऱ्या गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती यांचे संगम स्थान म्हणून प्रयागराज जगभरात परिचित आहे.
वाहनमुक्त क्षेत्र घोषित
महाकुंभमेळ्याचा परिसर यापूर्वीच वाहनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व स्वयंचलित वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. वाहने थांबविण्यासाठी स्वतंत्र स्थान निर्धारित करण्यात आले असून तेथून चालत संगमस्थानावर येण्याची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या स्नानासाठी प्रशासनाने भिन्न व्यवस्था केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्थानिकांना सूचना
ज्येष्ठ नागरिकांना संगमस्थानी आणण्यासाठी स्थानिकांनी चार चाकी वाहनांचा उपयोग करु नये. केवळ दुचाकी वाहनेच उपयोगात आणावीत, अशी स्पष्ट सूचना प्रयागराज येथील स्थानिक नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे भाविकांच्या हालचालींना बाधा येईल अशी कृती दुचाकी वाहनचालकांनी करु नये, असाही नियम प्रशासनाने बनविला आहे.
मकरसंक्रांतीला साडेतीन कोटी
मकरसंक्रांतीच्या दिवशी (14 जानेवारी) साडेतीन कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले, अशी माहिती प्रशासनाने मंगळवारी घोषित केली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच साधारणत: 45 लाख भाविकांनी संगमात डुबकी घेतली होती. यापुढे भाविकांची संख्या आणखीनच वाढणार असून त्यादृष्टीने प्रशासनाची योजना करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
आठवी पर्यंतच्या शाळा बंद
महाकुंभमेळ्यासाठी अतिप्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून प्रयागराज येथील आठवीपर्यंतच्या सर्व शाळांच्या सर्व वर्गांना जानेवारी 28, 29 आणि 30 हे दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे. कारण या तीन दिवसांमध्ये सर्वाधिक भाविक येथे येणार आहेत. त्यांच्या निवासाची सोय प्रयागराजच्या प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि अन्य स्थानांमध्ये केली आहे. प्रतिदिन त्रिवेणी संगमाच्या स्थानी प्रशासनाच्या अपेक्षेपेक्षाही अधिक संख्येने भाविकांचे आगमन होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढीव सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
राममंदिरात न येण्याचे आवाहन
आगामी 12 ते 15 दिवस अयोध्या आणि जवळपास वास्तव्य करणाऱ्या रामभक्तांनी भगवान रामलल्लांच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन राम मंदिर न्यासाचे प्रमुख चंपतराय यांनी केले आहे. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला दूरवरुन भाविक येत आहेत. ते अयोध्या आणि काशीलाही भेट देत आहेत. अशा भाविकांना भगवान रामलल्लांचे दर्शन विनासायास घेता यावे, यासाठी अयोध्येतील किंवा नजीकच्या नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
प्रशासकीय यंत्रणा सुदृढ
ड कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रशासनाच्या अपेक्षेपेक्षाही अधिक
ड मौनी अमावस्येसाठी प्रशासनाकडून वाढीव सुरक्षा आणि वास्तव्य व्यवस्था
ड बारा ते पंधरा दिवस स्थानिकांनी अयोध्या राममंदिरात न येण्याची विनंती
ड त्रिवेणी संगम परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था, अनेक सीसीटीव्ही कॅमेरे