बेंगळूरमध्ये पहिल्या दिवशी पावसाचा खेळ
भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी : पावसामुळे दुसऱ्या दिवसाची बीसीसीआयने बदलली वेळ
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारत-न्यूझीलंड यांच्यात बेंगळूर येथे खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने नाणेफेक देखील होऊ शकली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली. पावसाची स्थिती पाहता बीसीसीआयने दुसऱ्या दिवसाची वेळ बदलली आहे. नाणेफेक गुरुवारी सकाळी 8.45 वाजता तर सामना 9.15 वाजता सुरू होईल.
भारत-न्यूझीलंड पहिला कसोटी सामना बुधवारी सकाळी 9.30 वाजता सुरू होणार होता. तत्पूर्वी 9 वाजता नाणेफेक होणार होती. पण पहिल्या दिवशी म्हणजेच खूप पाऊस पडला, ज्यामुळे नाणेफेकही झाली नव्हती. मध्येच पाऊस थांबला होता, पण पुन्हा सुरु झाल्याने सामना रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, खराब हवामान असतानाही मैदानावर प्रेक्षक मोठ्या संख्येने जमले होते. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासह अनेक खेळाडूंनी सामन्याच्या पहिल्या दिवशी इनडोअर सराव केला. पावसामुळे मैदान चांगलंच ओलं झालं होतं. यामुळे खेळाडूंनी इनडोअर सराव केला. मैदानावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता असल्याने बीसीसीआयने दुसऱ्या दिवशी सामन्याची वेळ बदलली आहे. गुरुवारी सकाळी 9.15 पासून पहिले सत्र सुरू होईल. जे साडेअकरा वाजेपर्यंत असेल. मग दुपारच्या जेवणानंतर सामना पुन्हा 12.10 वाजता सुरू होईल. जो दुपारी 2.25 पर्यंत सुरू असेल. यानंतर दिवसाचे तिसरे आणि शेवटचे सत्र दुपारी 2:45 वाजता सुरू होईल आणि 4:45 पर्यंत चालेल.
98 षटके टाकण्याचा प्रयत्न
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना 15 मिनिटे आधी सुरु होईल आणि त्यानंतर प्रत्येक सत्रात 15 मिनिटे जोडली जातील. कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सुमारे 90 षटके खेळली जातात. पण भारत व न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रत्येक सत्रात थोडा वेळ जोडून किमान 98 षटके मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.
बेंगळूरमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुढील 5 ते 6 दिवस बेंगळूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण राहील आणि सकाळी जोरदार पाऊस पडू शकतो. एवढेच नाही तर दिवसभरातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.