राजदुतावासावरील छाप्याने राजनैतिक संबंध संपुष्टात
इस्त्रायलने सिरीयामधील इराणच्या राजदुतावासावर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा परिणाम म्हणून इराण सरकारने 14 एप्रिल रोजी साधारणत: 250 क्षेपणास्त्रे डागून आपला बदला पूर्ण केला. तर दुसऱ्या बाजूने दक्षिण आणि उत्तर अमेरिका खंडावरील देशांत राजनैतिक संबंध तोडून टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. राजदुतावासात पोलिस घुसवून कारवाई केल्याबद्दल मॅक्सिकोने इक्वेडोअरबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकलेले आहेत.
उत्तर अमेरिका खंडावरील मॅक्सिको आणि दक्षिण अमेरिका खंडावरील इक्वेडोअर या दोन्ही देशांमधील संबंध गेल्या आठवड्यात संपुष्टात आले. इक्वेडोअरच्या पोलिसांनी मॅक्सिकोच्या राजदुतावासात घुसून त्याठिकाणी आश्रय घेतलेल्या आपल्याच माजी उपराष्ट्रपतींना अटक करून घेऊन गेले. या पोलिस कारवाईची दखल घेत मॅक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी इक्वेडोअरबरोबरचे राजनैतिक संबंध तोडून टाकले आहे. इक्वेडोअरच्या या कारवाईमुळे गेल्या पंधरा दिवसांत दक्षिण अमेरिका खंडावर राजनैतिक वातावरण ढवळून निघाले आहे.
मॅक्सिकोच्या समर्थनार्थ बरेच देश एकजूट होऊ लागले. व्हेनेझुएलाने चार दिवसांपूर्वी आपला शेजारी देश इक्वेडोरबरोबरचे संबंध तोडून टाकले आहे. मॅक्सिकोने हे प्रकरण बरेच ताणून धरलेले असून त्यांनी संयुक्त राष्ट्र संघ व आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण अमेरिका खंडावरील आणि पृथ्वीच्या इक्वेटरवर वसलेल्या इक्वेडोअरमध्ये एक अनपेक्षित अशी पोलिस कारवाई झाली. इक्वेडोअरचे माजी उप राष्ट्राध्यक्ष आणि भ्रष्टाचार प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर असलेल्या
जॉर्ज ग्लास यांनी आपल्या देशातील मॅक्सिकोच्या राजदुतावासात तळ ठोकला. जॉर्ज ग्लास यांना भ्रष्टाचार प्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून त्यातील बरीचशी शिक्षा भोगणे बाकी आहे. मागील वर्षी त्याला दोनवेळा जामीन मिळाला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांना पुन्हा जामीन मिळाला. यावेळी मिळालेल्या जामीनाचा त्यांनी आपल्या सुखकर जीवनासाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने ते थेट इक्वेडोअरच्या राजधानीत असलेल्या मॅक्सिकोच्या राजदुतावासात थेट प्रवेश केला. राजदुतावासात प्रवेश मिळविल्यानंतर त्यांनी तेथे तळ ठोकण्याचा निर्णय घेतला.
मॅक्सिको सरकारनेही त्याला आक्षेप घेतला नाही. त्यानंतर जॉर्ज ग्लास यांनी मॅक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांकडे राजकीय आश्रय देण्याची मागणी केली. मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज लेब्रेडोअर यांनी त्यांना आश्रय देण्याची घोषणा 11 एप्रिल रोजी केली. मॅक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी ग्लास यांना आश्रय देण्याची घोषणा करताच इक्वेडोअरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नॉयबा यांनी आपल्या पोलिसांना भ्रष्टाचार प्रकरणी जामीनावर असलेल्या जॉर्ज ग्लास यांना मॅक्सिकोच्या राजदुतावासामधून अटक करून घेऊन येण्याचे आदेश दिले. आपल्या राष्ट्राध्यक्षांचा आदेश शिरोधार्ह मानून आपल्या लष्करी गाड्यांच्या ताफ्यासह मॅक्सिकोच्या राजदुतावासासमोर दाखल झाले. अर्थातच संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे राजदुतावास परिसरात प्रवेश देणे ना देणे हे संबंधीत देशांच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने मॅक्सिकोच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखून धरले असता इक्वेडोरियन पोलिसांनी जबरदस्तीने प्रवेश मिळविला. अनेक पोलिस संरक्षक भिंतीवरून राजदुतावासात पोहोचले. त्यानंतर त्यांनी मॅक्सिकोच्या राजदुतावासात घुसून इक्वेडोरियन उपराष्ट्राध्यक्ष जॉर्ज ग्लास यांना पकडून घेऊन गेले. यात मॅक्सिकोच्या राजनैतिक अधिकाऱ्यांबरोबर हातघाई झाली. पोलिसांनी ग्लास यांना अक्षरश: उचलून नेऊन आपल्या चिलखती वाहनात कोंबून त्यांची तुरुंगात रवानगी केली. श्री. ग्लास हे मागील निवडणुकीत पायउतार झाले होते.
इक्वेडोअरमधील आपल्या राजदुतावासावर स्थानिक पोलिसांनी घुसखोरी करून आपण आश्रय दिलेल्या जॉर्ज ग्लास यांना घेऊन गेल्याचे वृत्त थडकताक्षणीच मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज यांनी इक्वेडोअरबरोबरचे राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली. तसेच संयुक्त राष्ट्र संघाकडे तक्रार दाखल करत इक्वेडोअरचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपली फिर्याद दाखल केली. मॅक्सिकोच्या या निर्णयामुळे इक्वेडोअरच्या बहुतांश शेजारी राष्ट्रांनी मॅक्सिकोला आपला पाठिंबा दर्शविला. शेजारी देश व्हेनेझुएलाने चार दिवसांपूर्वी इक्वेडोअरबरोबरच आपले संबंध तोडले. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आणि मॅक्सिकोचे लोपेज लॅब्रेडोअर यांचे परममित्र मदुरो निकोलास यांनी त्यासंबंधीची घोषणा केली आहे. पेरु, चीली, ब्राझील आदी देशांनी मॅक्सिकोला आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे.
इतिहास आपली पुनरावृत्ती करत असतो. अमेरिकेच्या गुप्त बातम्यांना जगजाहीर करणारा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आणि विकीलिकचे संपादक व पत्रकार ज्युलियन असांजे यांनी जून 2012 मध्ये लंडनमधील इक्वेडोअरच्या राजदुतावासात शरण घेतली होती. ऑगस्ट 2012 मध्ये त्याला इक्वेडोअरने आश्रीत म्हणून मान्यता दिली. त्यानंतर तो या राजदुतावासात तब्बल पाच वर्षे वास्तव्याला होता. अखेर
प्रचंड आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्याला राजदुतावासातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला ब्रिटनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सध्या त्याच्या ब्रिटनमधून अमेरिकेत प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा इक्वेडोअर राजदुतावासातील राजकीय शरणागतीच्या प्रकरणावरून राजनैतिक वातावरण ढवळून निघाले आहे.
- प्रशांत प्रेमनाथ कामत