‘भारतीय सिनेमातील संगीत’वर बोलणार ए. आर. रेहमान
लता मंगेशकर यांना वाहणार आदरांजली
पणजी : जवळ येऊन ठेपलेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना आदरांजली वाहणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यासाठी नामवंत संगीतकार ए. आर. रेहमान गोव्यात येऊन महोत्सवात सहभागी होणार आहेत. दि. 27 नोव्हेंबर रोजी कला अकादमी, पणजी येथे हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.‘भारतीय सिनेमातील संगीत’ हा विषय त्या कार्यक्रमासाठी घेण्यात आला असून त्यात अनेक मान्यवर मंडळी भाग घेणार आहेत.सिनेमातील संगीताचे स्थान यावर रेहमान हे मंगेशकर यांच्या अनुषंगाने बोलणार असून नमन रामचंद्रन हे त्याचे सूत्रसंचालन करणार आहेत.
भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक जाणकार मंडळी कार्यक्रमास हजेरी लावणार असून चित्रपटातील संगीताचे महत्त्व यावरही चर्चा होणार आहे. लता मंगेशकर यांनी अनेक दशके चित्रपट संगीतावर आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आणि त्यांनी गायिलेली संगीतमय गीते आजही रसिक मंडळी सातत्याने गुणगुणताना, ऐकताना दिसतात. मंगेशकर यांच्या आवाजातील गीतांना रेहमान यांनी विविध सिनेमातून संगीतबद्ध केले आहे. रेहमान त्याचा थोडा आढावा कार्यक्रमातून घेणार असून 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 4 या वेळेत कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. संगीत क्षेत्रात घडत गेलेले बदल तसेच गायनातील परिवर्तन यावरही कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार असून रेहमान त्याबाबत मीमांसा करणार आहेत.