Karad Crime : कराडच्या नामांकित हॉटेलमधे हुल्लडबाज तरुणांचा पुण्यातील दाम्पत्यावर हल्ला!
कराडच्या हॉटेलमध्ये दाम्पत्याला बेदम मारहाण
कराड : कराडच्या नामांकित हॉटेलच्या सेक्शनमधे टेबलवर हुल्लडबाजी सुरू असल्याचे सांगितल्याच्या कारणावरून तिघांनी पुण्याच्या दाम्पत्याला बेदम मारहाण करत त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी सचिन अशोक पाटील (वय ४८, रा. सिद्धिविनायक नगरी, निगडी, पुणे) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हल्ल्यात सचिन पाटील यांच्यासह त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटील दाम्पत्य व त्यांचा १४ वर्षांचा मुलगा सांगलीहून कराड येथे आले होते. मुक्कामासाठी त्यांनी सायंकाळी साडेचार वाजता हॉटेलमध्ये खोली बुक केली. रात्री आठच्या सुमारास सचिन पाटील व त्यांची पत्नी पल्लवी पाटील हॉटेलमधे खाण्यापिण्यासाठी गेले. त्यावेळी बाजूच्या टेबलावर तीन अनोळखी तरुण बसले होते.
तेथे काही वेळाने गोंधळ सुरू झाल्याने पाटील यांनी वेटरला त्यांना दुसऱ्या टेबलवर बसविण्यास सांगितले. या कारणावरून रात्री साडेदहाच्या सुमारास त्या तिघांपैकी एकाने पाटील यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली व बुटाने मारहाण केली. पाटील यांच्या कपाळावर, डोळ्यावर आणि नाकावर मार लागला. पल्लवी पाटील यांनी सोडविण्याचा प्रयत्न करताच इतर दोघांनी त्यांनाही धक्का देऊन पाडले. त्यामुळे त्यांच्या उजव्या हाताला मार लागून टाके पडले.
वेटर व मालक पाटील यांनी हस्तक्षेप करून दोघांना सुरक्षितपणे किचनमध्ये नेले. त्यानंतर तिन्ही तरुण पळून गेले. जखमी पाटील दाम्पत्याला कराड येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटल येथे पुढील उपचार करण्यात आले. शहर पोलिसांनी अनोळखी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.