कारवारमध्ये काळादिनानिमित्त निषेध सभा
कारवार : देशात भाषावार प्रांतरचना करताना जिल्ह्यातील मराठी भाषिक भाग अन्याय व जबरदस्तीने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ कारवार, हल्याळ, सुपा म. ए. समितीतर्फे काळादिन पाळला. सभेचे आयोजन सदाशिवगड येथील सिद्धी देवस्थानच्या सभागृहात केले होते. यावेळी सदाशिवगड येथील कोकणी संस्कृती मंडळाच्या अध्यक्षा उषा राणे म्हणाल्या, गेल्या 68 वर्षांपासून सीमावासीय लोकशाहीमार्गाने लढा देत आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी संघर्ष करीत आहेत. तथापि, अद्यापही सीमवासियांना न्याय मिळालेला नाही. ही आपल्या देशातील लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. सीमालढा आता न्यायप्रविष्ठ झाला असून आमच्या देशाचे सर्वोच्च न्यायालय आम्हा सीमावासियांना निश्चितपणे न्याय मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सदाशिवगड ग्रा. पं. चे सदस्य दीपक देसाई म्हणाले, आमचा लढा कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. आम्ही आमच्या मायबोलीच्या रक्षण संवर्धनासाठी लढत आहोत. महाराष्ट्रात जाणे हा आमचा ध्यास असून न्याय देवतेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा, असे सांगितले. समितीचे कार्यकर्ते नरेश राणे म्हणाले, जगाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी मनात आणले तर गेल्या 6 ते 7 दशकापासून रेंगाळत पडलेल्या या प्रश्नावर यशस्वी तोडगा निघू शकतो. यावेळी गोविंद राणे यांचे भाषण झाले. सभेला यशवंत दातेकर, लक्ष्मण नाईक, गीता राणे, राजू राणे, संतोष कलगुटकर, चंद्रहास गीरप, सुनील ऐगळ, दीपक कडवाडकर, शाम नाईक, विशाखा आचारी, साईनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.