पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी तीनशे कोटींचा प्रस्ताव
कोल्हापूर / संतोष पाटील :
कोल्हापूरची जीवनदायिनी समजली जाणारी पंचगंगा नदी गेल्या काही दशकांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे या नदीचे पाणी दूषित झाले असून, त्याचा परिणाम पर्यावरण, जैवविविधता आणि कोल्हापूरकरांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातील उर्वरित 60 टक्के भागात ड्रेनेज लाईन आणि त्यासाठी एसटीपीची उभारणी करुन नदीत मिळणारे सुमारे 200 एमएलडी मैलामिश्रीत सांडपाणी रोखण्याची महत्वकांक्षी योजना यंदाच्या बजेटमध्ये प्रयोजित केली आहे. ती प्रभावीपणे अंमलात आल्यास पंचगंगा निर्मळ होण्यास वेळ लागणार नाही.
पंचगंगा नदी ही कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच उपनद्यांच्या संगमातून निर्माण झालेली नदी आहे. कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहणारी ही नदी पुढे नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीला मिळते. मात्र, शहरातील सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि नदीकाठावरील अनधिकृत बांधकामांमुळे पंचगंगेचे प्रदूषण गंभीर स्तरावर पोहोचले आहे. दरवर्षी हजारो मासे मृत्युमुखी पडतात, तर नदीकाठच्या गावांमध्ये दुर्गंधी आणि जलजन्य रोगांचा प्रसार होत आहे. महापालिकेने पंचगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एस.टी.पी.) आणि ड्रेनेज लाईन्स यांची उभारणी यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पात केला आहे. 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर प्रदूषणाची समस्या आणखी तीव्र झाली असून नदीला प्रदूषणमुक्त करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. यापाश्वर्यभूमीवर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीवर ठोस उपायोजना करण्याचा मानस अर्थसंकल्पातून व्यक्त केला आहे. यासाठी निधीची तरतूद आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
- महानगरपालिकेच्या ठोस उपाययोजना आणि खर्च
कोल्हापूर महानगरपालिकेने पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी चार मोठ्या प्रकल्पांची आखणी केली आहे. या प्रकल्पांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एस.टी.पी.), ड्रेनेज लाईन्स आणि पंपिंग स्टेशन्स यांचा समावेश आहे. या चार प्रकल्पांसाठी एकूण 279 कोटी 62 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांसाठी निधी केंद्र सरकारच्या नमामि गंगे आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांतून तसेच राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या स्वनिधीतून उभारला जाणार आहे.
1 जयंती नाला प्रकल्प : खर्च : 51 कोटी 13 लाख रुपये.
काय करणार : या प्रकल्पांतर्गत 9 दशलक्ष लिटर (एमएलटी) प्रति दिन क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एस.टी.पी.) उभारले जाणार आहे. याशिवाय 37 किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन आणि एक पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे.
उद्देश : जयंती नाल्यातून पंचगंगा नदीत मिसळणारे दूषित पाणी थांबवणे आणि त्यावर प्रक्रिया करणे.
2 दुधाळी प्रकल्प खर्च : 57 कोटी 32 लाख रुपये
उपाय योजना : येथे 19.50 दशलक्ष लिटर प्रति दिन क्षमतेचे एस.टी.पी., 13 किलोमीटर ड्रेनेज लाईन आणि तीन पंपिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत.
उद्देश : दुधाळी परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदी प्रदूषण कमी करणे. पंचगंगा नदीत मैलामिश्रीत जाणारे पाणी रोखणे.
3 लाईन बाजार प्रकल्प खर्च : 31 कोटी 96 लाख रुपय
काय आहे प्रकल्प : या भागात 26 किलोमीटर ड्रेनेज लाईन आणि एक पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे.
उद्देश : लाईन बाजार परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारून ते थेट नदीत मिसळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणे
4 बापट कॅम्प प्रकल्प खर्च : 139 कोटी 21 लाख रुपये
काय आहे प्रकल्प : सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या या योजनेत 50.76 किलोमीटर ड्रेनेज लाईन, 15 दशलक्ष लिटर प्रति दिन क्षमतेचे एस.टी.पी. आणि तीन पंपिंग स्टेशन्स बांधले जाणार आहेत.
उद्देश : बापट कॅम्प आणि आसपासच्या दाट लोकवस्तीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीचे प्रदूषण रोखले जाईल.
- उपाययोजनांचे महत्त्व
प्रदूषण नियंत्रण : या प्रकल्पांमुळे कोल्हापूर शहरातून पंचगंगा नदीत थेट मिसळणारे सांडपाणी रोखले जाईल. सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जाणार असल्याने प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल.
पर्यावरण संरक्षण : नदीतील मासे आणि जलचरांचे संरक्षण होईल, तसेच जैवविविधता टिकून राहील.
आरोग्य सुधारणा : दूषित पाण्यामुळे होणारे जलजन्य रोग आणि दुर्गंधीची समस्या कमी होईल. नदी काठावरील सुमारे आठ लाख नागरिक दुषीत पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड देत आहेत. जलप्रदुषण रोखले गेल्याने जलजन्य आजारांपासून मुक्ती मिळेल.
पुर्नवापर : एसटीपीमधून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा नवी दिल्लीच्या धर्तीवर शहरातील बगीचे आणि वृक्ष संपदा वाढीसाठी वापर करता येईल. औदयोगिक कारणासाठीही यापाण्याचा उपयोग होवू शकतो. शक्य असेल तिथे शेतीसाठीही हे पाणी देत येईल.
- प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रयत्नाना हवीय कोल्हापूरवासियांची साथ
आतापर्यंत पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले. मात्र तो खर्च तोकडा आणि टप्प्याटप्याने केल्याने त्याची प्रभाव दिसून येत नाही. शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे भविष्यकालीन विचार करुन नदी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासह नागरिकांमध्ये जनजागृती आणि सहभागावरही भर दिला पाहिजे. कच्रयाचे वर्गीकरण, प्लास्टिक बंदी आणि नदीकाठावरील अतिक्रमणे हटवणे यासारख्या पूरक उपाययोजनाही हाती घेण्याची गरज आहे. पंचगंगा नदी ही कोल्हापूरच्या अस्मितेचा आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या प्रयत्नातून महापालिकेने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारे आहे. 279 कोटी 62 लाख रुपये खर्चून उभारल्या जाण्राया या उपाययोजना पूर्ण झाल्यास पंचगंगा पुन्हा स्वच्छ आणि निर्मळ होईल. या प्रयत्नांना नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास हा लढा यशस्वी होईल.