कैगा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारी खासगी बस जळून खाक
कारवार : येथील डॉ. पीकळे रस्त्यावर कार जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी कैगा अणुउर्जा प्रकल्पस्थळापासून कैगा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणारी खासगी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून आश्चर्यकारक आणि चमत्कारीकरित्या बसमधील कर्मचारी सुखरुपपणे बचावले आहेत. ही दुर्घटना कैगा-यल्लापूर रस्त्यावरील वीरजे येथे घडली. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, कैगा अणुउर्जा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी कारवार आणि मल्लापूरपासून कैगा प्रकल्पापर्यंत आणि परत अनेक बसेस धावतात. शुक्रवारी रात्री प्रकल्पस्थळी मुक्काम ठोकलेल्या बसमधून काही कर्मचारी ड्युटी आटोपून सकाळी मल्लापूरच्या दिशेने निघाले होते. वीरजे येथे बसने अचानकपणे पेट घेतला. सुदैवाने सर्व कर्मचारी बसमधून वेळीच उतरल्याने सुखरुपपणे बचावले. बसने पेट घेतलेली जागा जंगल प्रदेशात आहे. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत थोडा उशीर झाला. त्यामुळे बस जळून खाक झाली. बस पेट घेण्याचे नेमके कारण आणि बसमधील कर्मचाऱ्यांची सुखरुप बचावणे हे आश्चर्यचकीत असल्याचे सांगण्यात आले. यल्लापूर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.