गांधी जयंतीला करणार राजकीय पक्षाची स्थापना
प्रशांत किशोर यांची माहिती : बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर उर्फ पीके यांनी आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केव्हा करणार हे जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षाबाबत चर्चा सुरू आहे. आपला पक्ष बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी रविवारी पाटणा येथे केली. तसेच गांधी जयंती म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटणा येथील ‘जन सुराज’च्या राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबरला पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. आपला पक्ष 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका लढवणार आहे. पक्ष स्थापनेपूर्वी पाटणा येथील बापू सभागृहात ‘जन सुराज’च्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला. पक्षाचा नेता कोण असेल हेही जनताच ठरवेल, असे प्रशांत किशोर म्हणाले. ‘जन सुराज’ हा पक्ष प्रशांत किशोर किंवा कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा नसून बिहारच्या जनतेचा असेल. राज्यातील जनताच ‘जन सुराज’ तयार करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या नातवासह अनेक लोक या मोहिमेत सहभागी झाले होते.
याआधी 10 जून रोजी पाटणा येथील ‘जन सुराज’च्या कार्यक्रमात तीन प्रस्ताव आणण्यात आले होते. उपस्थित लोकांनी या प्रस्तावांना होकार दिला. पहिला प्रस्ताव ‘जन सुराज’ला राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याबाबत होता, त्यावर सर्वांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी ‘जन सुराज’ला राजकीय पक्ष बनवावे, असे सांगितले. दुसरा प्रस्ताव बिहारच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याबाबत होता, त्यावरही सर्वांनी सहमती दर्शवली. त्याचवेळी, तिसरा प्रस्ताव समाजातील सर्व घटकांना त्यांच्या संख्येनुसार निवडणुकीची तिकिटे देण्याचा आणि ‘जन सुराज’मध्ये सहभाग सुनिश्चित करण्याचा होता. या प्रस्तावालाही उपस्थितांनी सहमती दर्शवली होती.