कामगार चळवळ मोडीत काढण्याचा ‘डाव’
डॉ. आनंद मेणसे : नवीन विधेयक कामगारांसाठी घातक
कोल्हापूर
कामगार चळवळ मोडीत काढण्यासाठीच केंद्र सरकारने कामगार विषयक विधेयक आणल्याचा आरोप बेळगावचे डॉ. आनंद मेणसे यांनी केले. रोबोच्या (यांत्रिक मानव) माध्यमातून कामगार नसलेली फॅक्टरी उभारली जात आहे. सर्वच बाबतीत कामगाळ चळवळीला धोका निर्माण करण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सात दिवसांपासून सुरू असलेल्या अवि पानसरे व्याख्यानमालेची सांगता रविवारी ‘उद्याचा महाराष्ट्र’ या विषयावरील डॉ. आनंद मेणसे यांच्या व्याख्यानाने झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार होते.
डॉ. मेणसे म्हणाले, आयटी क्षेत्रातील स्थितीही गंभिर आहे. घरातूनच कामे केली जात असलेल्या कर्मचाऱ्यांना आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो. त्याचा मालक कोण आहे, हे माहित नसते. संबंधित कंपनीतील कर्मचारी अन्याय विरोधात रस्त्यावर उतरल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होते. त्यामुळे कामगार चळवळीत येण्याचे धाडस त्यांच्याकडून होत नाही. यामुळे कामगार चळवळीला धोका निर्माण झाला आहे. असाच प्रकार रोबो सिस्टीमचा होत असलेल्या वापरावरूनही समोर येत आहे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कुंडलिक एकशिंगे, दिलीप पवार, शिवाजीराव परूळेकर आदी उपस्थित होते.