सैन्य असलेले ठिकाण मंदिराप्रमाणेच पवित्र!
पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार : हिमाचलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी
► वृत्तसंस्था/ लेपचा (हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना मिठाई भरवत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. हा देश तुमच्यामुळे सुरक्षित आहे, या देशाच्या सीमा तुमच्यामुळे भक्कम आहेत, जिथे राम असेल तिथे अयोध्या आहे आणि जिथे तुम्ही असाल त्याच ठिकाणी माझी दिवाळी असेल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच माझ्यासाठी आमचे सैन्य ज्याठिकाणी तैनात आहे ते ठिकाण मंदिरापेक्षा कमी नाही, असा दावाही त्यांनी केला.
देशातील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी देशाच्या सीमेवर पोहोचलेल्या पंतप्रधानांनी सैनिकांना संबोधित करत त्यांचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही उत्साहाने आणि ऊर्जेने भरलेले आहात. देश तुमचा ऋणी आहे. दिवाळीच्या काळात तुमच्या कल्याणासाठी दिवाही लावला जातो. जिथे राम आहे तिथे अयोध्या असल्याचे नमूद करत जिथे तुम्ही आहात तिथे माझी दिवाळी साजरी होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
‘भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या शौर्याची किमया, तसेच ऐतिहासिक भूमी आणि दिवाळीचा हा पवित्र सण’ हा एक अद्भूत योगायोग आहे, ही एक अद्भूत भेट आहे. समाधान आणि आनंदाने भरलेला हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासियांसाठी दिवाळीत नवीन प्रकाश घेऊन येईल, हा माझा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या 30-35 वर्षांत अशी एकही दिवाळी नाही जी मी तुमच्यासोबत साजरी केली नाही. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नसतानाही सणासुदीला सीमेवर जायचो, याची आठवणही त्यांनी करून दिली.
संकटाच्या वेळी आपले सैन्य देशातील लोकांना तसेच परदेशी लोकांना मदत करते आणि त्यांची सुटका करते. सुदान किंवा तुर्की अशा ठिकाणी भारतीय सैन्याने आपली चमक दाखवून दिलेली आहे. आज जगात भारतीय सैन्याची प्रतिमा उजळलेली असल्यामुळे आपल्याकडून अपेक्षा वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या सीमा सुरक्षित राहणे आणि देशात शांतता राखणे महत्त्वाचे आहे. माझे मित्र जोपर्यंत हिमालयासारख्या सीमेवर कार्यरत आहेत तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. प्रत्येकाला कुटुंबाची आठवण येते, पण तुमच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपले सैनिक जीव धोक्मयात घालून नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. सीमेवरील देशाची सर्वात मजबूत भिंत असल्याचे आपल्या सैनिकांनी नेहमीच सिद्ध केल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधान दरवर्षी दिवाळीला जवानांसोबत!
2014 पासून पंतप्रधान मोदी दरवषी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यंदा दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले होते. पंतप्रधान मोदी 2014 मध्ये सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. यानंतर, 2018 मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ, 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरी, 2020 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिह्यातील नौशेरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
देशवासियांना शुभेच्छा
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो.’ असे ट्विट त्यांनी ‘एक्स’वर केले आहे.