जबडाच नसलेला व्यक्ती
ना बोलू शकतो, ना खाऊ शकतो
एक व्यक्ती जबडय़ाशिवायच जन्माला आला आहे. जबडा नसल्याने त्याला बोलता येत नाही तसेच तो खाऊ देखील शकत नाही. तसेच योग्यप्रकारे श्वास घेणेही त्याला शक्य होत नाही. शारीरिक अडचणींमुळे लोक त्याच्यापासून अंतर राखत होते. स्वतःचा विवाह कधीच होऊ शकणार नसल्याचे या व्यक्तीला वाटायचे.
या व्यक्तीचे नाव जोसेफ विलियम्स आहे. 41 वर्षीय जोसेफ अमेरिकेच्या शिकागो येथे राहतो. जन्मापासूनच तो दुर्लभ ओटोफेशियल सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. यामुळे तो बोलू शकत नाही. साइन लँग्वेज आणि इटिंग टय़ूबचा वापर तो करत आहे.
माझ्यासाठी डेटिंग अत्यंत अवघड होते, कारण माझा आत्मविश्वास खालावला होता, मी स्वतःला निरर्थक समजू लागलो होतो. परंतु स्वतःवर विश्वास दाखवू लागल्यावर माझ्यात बदल झाले. माझा शोध पत्नीला मिळविल्यावरच थांबल्याचे जोसेफने सांगितले आहे.
जोसेफ हा पेशाने वेल्डर आहे. स्वतःचे जीवन एकटय़ानेच घालवावे लागेल अशी धारणा तयार झाली होती. परंतु 2019 मध्ये माझी भेट 39 वर्षीय वानियाशी झाली. आमच्या नात्याची सुरुवात मैत्रीने झाली, त्यानंतर आम्ही डेटिंग करायला लागलो आणि परस्परांच्या प्रेमात पडलो. 2020 मध्ये आम्ही विवाह केला. माझा विवाह होईल अशी अपेक्षाही लोकांनी केली नव्हती. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला देखील हेच वाटत होते असे जोसेफ यांनी म्हटले आहे.
मी वेगळा आहे हे जाणून आहे. याचमुळे काही लोकांना मी वाईट वाटतो आणि ते मला स्वीकारत नाहीत. परंतु मी देखील माणूसच आहे, मला देखील मन, भावना आहेत. इतरांप्रमाणे मला देखील आदराने वागविणे गरजेचे होते. माझ्याकडे एकटक पाहणे आणि वेगळा दिसत असल्याने लोकांनी प्रश्न विचारलेले मला आवडत नसल्याचे जोसेफ यांनी म्हटले आहे.
जोसेफ यांनी साइन लँग्वेज, देहबोली, फोन आणि रायटिंग नोट्सद्वारे स्वतःचे म्हणणे मांडणे शिकून घेतले आहे. तर भोजनासाठी ते पोटाला जोडलेल्या एका विशेष टय़ूबचा वापर करतात. जन्मापासूनच जोसेफला जबडा नाही. एकेदिवशी डीजे होण्याचे माझे स्वप्न आहे. संगीत हे माझ्यासाठी स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम असल्याचे ते सांगतात.