बेडकांच्या राज्यात...
फार पूर्वीची गोष्ट आहे. एकदा एका जंगलामध्ये मोठ्ठं तळं होतं. त्या तळ्यामध्ये बेडकांच्या खूप वसाहती होत्या. सगळे बेडूक एकमेकांना धरून आनंदाने राहत होते. संकट आलं की सांगत होते. पण या तळ्यावरती पाणी प्यायला अनेक पक्षी, प्राणी यायचे. त्यामुळे या बेडकांवर नेहमीच बाहेरून हल्ले होत असत. काही ना काही कारणाने बेडूक प्राण्यांच्या पायाखाली चेंगरले जायचे, तर कधी कधी मरूनही जायचे. कुणाकडे फिर्याद करावी, दाद मागावी हे त्यांना कळेना. शेवटी कोणीतरी या बेडकांना स्वतंत्र राज्य स्थापन करावं अशी कल्पना सुचवली. बेडकांची मुलं उड्या मारायला लागली. अरे व्वा आपलं राज्य झालं म्हणजे ह्या सगळ्या त्रास देणाऱ्या प्राण्यांना चांगली अद्दल घडवता येईल असं वाटून ते खूप खूष झाले. आपण बंदोबस्त करूया. बेडकांमधल्या सगळ्यात वयोवृद्ध बेडकाने सगळ्या बेडकांना एकत्र यायला सांगितलं. आजच्या आज आपण मोठी सभा घेणार आहोत आणि आपलं स्वत:चं राज्य स्थापन करणार आहोत. सगळे बेडूक एकत्र आले. सगळीकडून डराव, डराव आवाज जोरात सुरू झाले. प्रत्येक बेडूक दुसऱ्याला काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नात मोठ मोठ्याने डराव, डराव म्हणत होता. असं पूर्ण रात्रभर चालू राहिलं होतं. पण कोणीच कुणाला काही सांगू शकले नाही किंवा ऐकू शकले नाही. झालं या साऱ्या प्रकारात सगळे नाराज झाले. शेवटी वयस्कर बेडूक पुढे येऊन लहान मुलांना सांगू लागला. आपल्या बेडकांचे हे असेच असते. सगळेजण खूप हुशार असल्यामुळे शहाण्यांचं एकमेकांशी पटत नाही आणि मूर्ख बेडकांचं एकमेकांशी एकमत होत नाही. आता काय करायचं? सगळे बेडूक काळजीत पडले. पुन्हा दुसऱ्या दिवशी सभा बोलावली आणि सगळ्या बेडकांनी खूप जोरात ओरडून देवाला हाक मारायला सुरुवात केली. डराव डराव डराव डराव... त्यांचा हा गोंधळ सुरू असताना आजूबाजूच्या झाडांवरती असलेले पक्षी, प्राणी उडून दूर गेले पण नाकतोडे मात्र चिडले. त्यांचे प्रमुख पाटील म्हणाले ...ह्या बेडकांचे स्वतंत्र राज्य झालं तर आपलं काही खरं नाही. आपण यांचं राज्य होऊच द्यायचं नाही. त्यांनी तिथे झाडाखाली उपोषण करायला सुरुवात केली. आणि मग देवाला मात्र हे सगळं पाहून काय करावे काही सुचेना. शेवटी देव तिथे प्रकट झाले. त्यांनी बेडकांचं म्हणणं ऐकलं. नाकतोड्याचं म्हणणं ऐकलं आणि काहीतरी उपाय सुचवायसाठी विचार करू लागले. देवांनी त्यांना एक उपाय सांगितला मी इथे झाडाला एक मोठा तराजू बांधतो या तराजूमध्ये सगळे बेडूक जर सारख्याच प्रमाणात येऊन बसले दोन दोन किंवा पाच पाचच्या गटाने आणि तराजूची दोन्ही पारडी सारखी, समान झाली तर आपल्याला राजा ठरवणं अवघड जाणार नाही. वयोवृद्ध बेडकाला खूप आनंद झाला. त्याने त्या बांधलेल्या पारड्यामध्ये अनेक बेडकांना बोलून ढकलून आणून बसवलं. दोन दोन, चार चार करत पारड्यात बसवलं पण दुसऱ्या पारड्यात तो बेडूक ठेवायला गेल्यानंतर आधीच्या पारड्यातले बेडूक उडी मारून कुठेतरी पळून जात होते. काही केल्या ते दोन्ही पारड्यात सारखे होतच नव्हते. आता मात्र तो वयोवृद्ध बेडूक कंटाळला आणि यातून काही निष्पन्न होणार नाही हे त्याच्या नेमके लक्षात आले. बाकीचे बेडूक हा तराजूच कसा वाईट आहे, खोटा आहे, चुकीचा आहे म्हणून शंख करू लागले. खरंतर या तराजूमुळेच त्यांचा राजा ठरणार होता. पण आता त्यांचं एकमत होत नसल्यामुळे ते तराजूला शिव्या देत होते. असं करता करता दोन-चार दिवस गेल्यानंतर बेडकांनी इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली. त्या तळ्यामध्ये एका झाडाचा ओंडका पडला होता. बिचारा वाळून गेला होता. इकडून तिकडे तरंगत होता. जशा लाटा उठतील तसा तो हेलकावे खात होता. बेडकाच्या मुलांना गंमत वाटली. सगळे बेडूक हळूहळू त्याच्यावरती येऊन बसू लागले. खेळू लागले, अगदी स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वागू लागले. तरी ओंडका बुडाला नाही. सगळ्या बेडकांना खूप मज्जा वाटली. सगळे बेडूक शांतपणे त्याच्यावर बसून होते. आता वयोवृद्ध बेडकाला आनंद झाला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं हा ओंडका चांगला आहे, ह्यालाच आपण राजा करूया. सगळे बेडूक खुश झाले आणि सगळे त्या ओंडक्याचा जयजयकार करू लागले. ओंडका कुणाशी भांडायचं नाही, कोणाशी त्यांचे मतभेद होत नव्हते, कुणाला तो कशालाही विरोध करत नव्हता, त्याच्यामुळे आता ओंडका या बेडकांचा राजा झाला होता. नाकतोडे मात्र कुठे गायब झाले हे आजपर्यंत कुणालाही कळलंच नाही.