कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्वगुणी माणसाला मन:शांती प्राप्त होते

06:31 AM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

आत्मा हा मायेने वेढला गेला की, त्याला जीवपण प्राप्त होते. मायेच्या प्रभावामुळे तो सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या तालावर नाचू लागतो. प्रत्येक प्राण्यात हे तिन्ही गुण असतातच. मनुष्य सोडून इतर प्राण्यात तमोगुण अधिक असतो पण बुद्धीचा वापर करून रज किंवा तमोगुण त्याच्या स्वभावात अधिक डोकावत असेल तर त्याना मागे सारून सत्वगुणाची वाढ करण्याची संधी माणसाला ईश्वराने दिली आहे. आपला आत्मा मुक्त होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने ही संधी आवश्य घ्यावी.

Advertisement

सध्या आपण अभ्यासत असलेल्या एषु त्रिषु प्रवृद्धेषु मुक्तिसंसृतिदुर्गतीऽ । प्रयान्ति मानवा राजंस्तस्मात्सत्त्वयुतो भव ।।34।। ह्या श्लोकात सत्वगुण वाढला असता माणसाला मुक्ती मिळते, रजोगुण वाढला असत तो मृत्यूनंतर संसारात परततो तर तमोगुणी माणसाला दुर्गति प्राप्त होते असे बाप्पांनी सांगितले आहे. हे लक्षात घेऊन माणसाने सत्वयुक्त व्हावं कारण तो संयमी, लोककल्याणकारी कार्ये करणारा  असल्याने त्याला मरणोत्तर चांगली गती मिळते.

आपला स्वभाव सात्विक होण्यासाठी, नेहमी शास्त्रवाचन, हरिकथा श्रवण करत रहावे. त्यातून हरिने दुराचारी लोकांचे पारिपत्य करून सदाचारी लोकांचे रक्षण केलेले आहे हे लक्षात येते. संत चरित्रांचा अभ्यास करावा म्हणजे त्यातून विपरीत परिस्थितीत संतानी ईश्वरी अनुसंधान कसे चालू ठेवले होते, हे लक्षात येते. तसेच कठीण परिस्थितीतून त्यांनी मार्ग कसा काढला व तो काढण्यासाठी त्यांना ईश्वरी सहाय्य कसे मिळाले हे समजते.

हेही लक्षात येते की, आपल्याही कठीण प्रसंगात आपण न डगमगता आपण ईश्वरी अनुसंधान चालू ठेवल्यास आपल्यालाही ईश्वरी सहाय्य प्राप्त होऊन आपण त्या कठीण प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडू. ईश्वरी अनुसंधान राखू शकलो की, त्याच्या कृपेने आपल्या आयुष्यात घडणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगात आपल्यात असलेले रज व तम गुण केव्हा व कसे डोके वर काढतात, हेही लक्षात येते आणि पुन्हा तसा प्रसंग निर्माण झाला की, आपले वर्तन सुधारण्याची संधी घेता येते. आपले जीवन रहाट गाडग्यासारखे असल्याने आपल्या जीवनात त्याच त्याच घटना, तेच तेच प्रसंग वारंवार घडत असतात. तसेच त्याच त्याच व्यक्तीही वारंवार भेटत असतात, त्यातून पुन्हा तशीच चूक होऊ नये म्हणून, मागील चूक दुरुस्त करून आपण पुढे जाऊ शकतो.

सत्वगुणी मनुष्य ज्ञानी असतो. त्या ज्ञानाच्या बळावर तो योग्य काय अयोग्य काय हे समजू शकतो आणि त्यानुसार वागत गेल्यास त्याला मन:शांती प्राप्त होते. फक्त त्याने मीच काय तो ज्ञानी, सुखी असा अहंकाराचा वारा अंगात भिनवून घेऊ नये.

तसेच अधूनमधून स्वभावात डोकावणारी रजोगुणाची मोह होणे, हाव सुटणे ही लक्षणे वेळीच ओळखून सावध व्हावे व वर्तन सुधारावे तसेच तमोगुणी माणसाप्रमाणे आपलेच म्हणणे बरोबर आहे असा आव आणून पापाचरण करू नये. थोडक्यात आपल्या वर्तनाचे वारंवार परीक्षण करत राहून योग्य त्या सुधारणा करत राहाव्यात. पुनऽपुन्हा त्याच त्याच चुका होत राहिल्या तरी नाउमेद न होता चिकाटीने प्रयत्न चालू ठेवावेत. ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे आणि जो याप्रमाणे पुढे जात राहतो. त्याच्याबरोबर ईश्वर एखाद्या साथीदारासारखा किंवा नातेवाईकासारखा सतत सोबत असतो. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत, न डगमगता सत्वगुणाची जोपासना करण्याचे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू ठेवावी. अशी दक्षता घेत गेल्यास हळूहळू आपल्या स्वभावातील रज व तमोगुण मागे हटून सत्वगुण प्रकट होऊ लागतील ही अर्थातच दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे आणि ईश्वरावरील दृढ श्रद्धेने ती चालू ठेवावी लागते.

क्रमश:

Advertisement
Next Article