कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनुष्य ज्या प्रकारचे तप करतो त्याप्रकारचे फळ त्याला मिळते

06:54 AM Jul 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय अकरावा

Advertisement

कायिक, वाचिक, मानसिक तपाबद्दल सविस्तर सांगून झाल्यावर त्यातील उपप्रकार बाप्पा आपल्याला सांगत आहेत. पूर्वकर्मानुसार आपल्याला स्वभाव मिळालेला असतो व त्यानुसार आपल्या हातून घडणाऱ्या कर्मांवर त्याचा प्रभाव पडणार असतो. त्यातील बरोबर कोणते व चूक कोणते हे लक्षात आल्यास आपण आपल्या स्वभावात बदल करायचा प्रयत्न करू शकतो. त्यातील सात्विक, राजस व तामस तपातील फरक आपण पाहिला. सात्विक तप हे सर्वश्रेष्ठ असून, कर्मफळाची अपेक्षा न करणे, सश्रद्धता, निरपेक्षता ही सात्विक वागणुकीची वैशिष्ट्यो असतात. असं वागणाऱ्या माणसाला आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत ही खात्री वाटत असल्याने तो सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागत असतो. सर्वांचं कल्याण व्हावं या सदीच्छेने तो लोककल्याणकारी कार्ये करत असतो. या तपामुळे आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती अशी कायम टिकणारी फळे त्याला मिळतात. राजस तप करणारा मनुष्य स्वत:च्या स्वार्थासाठी सर्व कर्मे करत असतो. यामुळे तो दुसऱ्याचे धन लुबाडत असतो पण इतरांना इजा होईल असे काही करत नाही. तामस तप करणारा हट्टाने स्वत:ला पीडा करून घेतो. स्वत:ची व इतरांची शारीरिक हानी होईल असे वागत असतो. हे तप हट्टाने केले जाते. ते करणाऱ्यालाही पीडा होते आणि पाहणाऱ्यालाही कष्ट होतात. यात कुणाचेही हित न होता दुसऱ्याला मुळापासून उखडून टाकायची इच्छा असते. या तपाला कुठलाही शास्त्राrय आधार नसतो. पूर्वीच्या काळी राक्षस मंडळी, स्वत: क्लेश सोसून एका पायावर उभे राहून जप करणे, उपाशी राहणे असे तप करून देवाकडून वर मिळवत आणि त्या वराचा उपयोग करून गरिबांना छळत असत.

Advertisement

मनुष्य ज्या प्रकारचे तप करतो त्याप्रकारचे फळ त्याला मिळते. सात्विक तप करणारा ईश्वराने दिलेलं काम हे ईश्वराचेच काम समजून निरपेक्ष वृत्तीने करत असतो. त्याच्या वागणुकीचे परिणाम म्हणून त्याचा उद्धार होतो. राजस तप करणारा माणूस स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याची लुबाडणूक करत असतो. स्वत:चा मानमरातब वाढावा या हेतूने दांभिकपणे धार्मिक कर्मे करत असतो. त्याच्या अशा वागणुकीचे परिणाम म्हणून त्याची जन्ममृत्युच्या फेऱ्या चालूच राहतात. तामसी मनुष्य दुसऱ्याला पीडा होईल, त्रास होईल असे वर्तन करत असल्याने तो नरकात जातो.

प्रत्येकामध्ये सत्व, रज, तम हे तिन्ही गुण असतातच आणि प्रारब्धानुसार त्याच्या जीवनात निरनिराळे प्रसंग घडत असतात. असे जर आहे तर माणसाच्या हातात काय आहे ह्यावर विचार केला तर लक्षात येईल की, जीवनात कोणते प्रसंग यावेत हे जरी माणसाच्या हातात नसलं तरी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात कसं वागायचं हे बुद्धीचा वापर करून मनुष्य ठरवू शकतो. म्हणून प्रत्येक कर्म करताना किंवा प्रतिक्रिया देताना माणसानं जपून वागावं, जपून बोलावं. सत्व, रज किंवा तम या तीन्हीपैकी माणसाच्या स्वभावानुसार कोणताही एक गुण प्रसंगी जोर करत असतो व त्याच्या प्रभावाखाली येणारा मनुष्य त्या नुसार वागतो. हे लक्षात घेऊन माणसाने वेळीच सावध व्हावे आणि त्याची वागणूक जास्तीतजास्त सत्वयुक्त कशी होईल याकडे लक्ष द्यावे. म्हणजे तो ईश्वराला प्रिय होऊन त्याचा उद्धार होईल.

ज्याअर्थी ईश्वराने हे तीन गुण दिलेले आहेत त्याअर्थी त्यांचा उपयोग निश्चितच आहे. सत्वयुक्त वागून माणसाने निरपेक्षपणे लोकसेवा करावी. रजोगुणी मनुष्य अविरत प्रयत्न करत असतो. आपल्यातल्या रजोगुणाचा उपयोग करून घेऊन आपल्यातल्या चुका दुरुस्त करत त्याने सत्वगुणी होण्याचा प्रयत्न सतत सुरू ठेवावा. तमोगुणी माणसाने जर आपली वागणूक चुकीची होऊ लागली, तर स्वत:चा राग यावा व त्यातून वागणुकीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत रहावे.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article