महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माणसाला स्नेहमायेने बांधले गेलो आहोत असा भास होतो

06:30 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

उद्धवाला भगवंतानी उपदेश करून आत्मस्वरूपाचे ज्ञान दिले. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, भगवंता आत्तापर्यंत मी मायेने वेढला गेलेलो होतो म्हणून माझ्या आत्मरूपाचे ज्ञान मला नव्हते परंतु तुझी भक्ती तू मला वाढवायला लावलीस. त्यामुळे माझ्याभोवती असलेले मायेचे पटल दूर झाले. त्याबरोबर स्वरूपस्थिती मला अर्पण करून तू माझ्यावर फार मोठी कृपा केलेली आहेस. हृषीकेशी तुम्हाला सोडून जो इतरांना भजेल तो मनुष्य नसून पशुच असतो. त्याचा हरिभजनावर विश्वास नसल्याने त्याला नुसते पशु म्हणून भागणार नाही तर त्यांची गणना गाढवात करावी लागेल. अशा लोकांना तू त्यांच्यावर केव्हढे उपकार करत आहेस ह्याची कल्पना नसते. माणसाची इंद्रिये सहसा बाह्य गोष्टींकडे आकर्षित होत असतात. त्यांना पूर्णपणे तेथून खेचून काढून तुम्ही त्यांना अंतर्मुख करता त्यामुळे मनुष्य आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. असे डोंगराएव्हढे उपकार तू माणसांवर करत असताना त्या उपकारांचा ज्यांना विसर पडतो त्यांना खरोखरच कृतघ्न म्हणावे लागेल. अर्थात जगात जसे कृतघ्न लोक आहेत त्याप्रमाणे तुझे उपकार जाणून तुला स्मरणारेही लोक आहेत. ते मात्र शरीराने, वाणीने, चित्तातून आणि धनाने तुझेच भजन करत असतात. इतर कुणाचे भजन करावे असा विचार त्यांच्या मनातही येत नसणार अशी माझी खात्री आहे. तुला तुझ्या भक्तांची किती काळजी असते. त्या काळजीपोटी माझ्या निमित्ताने तू माणसाच्या हृदयात वसत असलेले आत्मस्वरूप प्रकाशात आणलेस. ही तुझी कृती एखाद्या शिल्पकाराप्रमाणे आहे. शिल्पकार ज्याप्रमाणे दगडाच्या ओबडधोबड शिळेतून आवश्यक त्या ठिकाणच्या कपच्या काढून त्यातील सुंदर मूर्तीचे दर्शन घडवतो त्याप्रमाणे तू भक्तांच्यातले षड्विकार काढून त्यांची चित्तशुद्धी घडवून आणतोस त्यामुळे त्यांच्यातील आत्मस्वरूपाचे दर्शन त्यांना घडते. म्हणून जे जे भक्त तू केलेल्या उपदेशाचे श्रद्धेने श्रवण करतील, ऐकलेले वारंवार आठवून मनावर बिंबवतील आणि इतरांना त्याचे महात्म्य कीर्तनातून सांगतील त्या सगळ्यांचा निश्चित उद्धार होईल. मी आत्ता सांगितले तसे करून तू माझ्यावर पूर्ण कृपा केलीस आणि माझे भवबंधन तोडून टाकलेस. तुझ्या उपदेशाचा छिन्नी हातोडा चालवून तू माझ्यातल्या आत्मस्वरुपाला प्रकट होण्यासाठी काय काय केलेस ते आता सांगतो. सृष्टीची वाढ होण्याच्या दृष्टीने तू लोकांची निर्मिती केलीस. बायको, मुले, नातेवाईक अशी निरनिराळी नाती निर्माण करून सगळ्यांचे एकमेकांवरचे प्रेम वाढवलेस. त्यातून सगळ्यांना एकमेकांबद्दल आपुलकी वाटू लागली त्यातून एकमेकांकडून अपेक्षाही वाढू लागल्या. माझा जन्म यादव कुळात झाला. वृष्णि, अंधक, सात्वत इत्यादि नातेवाईक मला लाभले. नातेवाईक, पत्नी, मुले, ह्यांच्या प्रेमाच्या पाशात मी गुंतलो होतो. ते स्नेहपाश तुम्ही तोडून टाकलेत. त्यामुळे तुमचे ध्यान मला लागले. ज्याप्रमाणे गारुडी खेळ दाखवताना मोहिनी विद्येचा वापर करून हातात धरलेली दोरी साप आहे असे प्रेक्षकांना भासवतात त्याप्रमाणे तुझ्या अधीन असलेली तुझी माया तोडायला अत्यंत कठीण असलेल्या स्नेहपाशात लोकांना घट्ट बांधून ठेवल्याचे भासवते. भासवते असे म्हणण्याचे कारण म्हणजे माणसाची खरी ओळख आत्मतत्व हीच असताना तो ती विसरतो म्हणून त्याला आपण स्नेहमायेने बांधले गेलो आहोत असा भास होतो. माझ्या बाबतीतले हे स्नेहमायेचे बंधन तुम्ही माझ्यावर कृपा करून आधीच नाहीसे करून टाकले आहेत. एव्हढेच नव्हे तर तुमच्या हातात असलेल्या भवबंधन छेदण्याच्या शस्त्राला तुमच्या युक्तीची धार लावून त्याला सतेज करून मला अर्पण केलेत. आता तुम्ही मला दिलेल्या शस्त्राचा वापर करून मी जगाचे भवबंधन तुमच्या आशीर्वादाने तोडून टाकू शकीन एव्हढी कृपा तुम्ही माझ्यावर केली आहेत.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article