अमेरिकेत पाकिस्तानी नागरिकाला अटक
ट्रम्प यांच्या हत्येची मिळाली होती सुपारी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी इराणशी निगडित एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. अमेरिकेतील नेत्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. हा पाकिस्तानी नागरिक अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करू पाहत होता असे समोर आले आहे.
2020 मध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येच सूड उगविण्यासाठी 46 वर्षीय आसिफ मर्चंटने ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला होता. अमेरिकेला जाण्यापूर्वी आसिफ हा अनेक दिवसांपर्यत इराणमध्ये राहिला होता. तर ट्रम्प यांच्या हत्येचा कट पूर्ण करण्यासाठी तो एप्रिल महिन्यात पाकिस्तानातून अमेरिकेत पोहोचला होता. तेथे पोहोचल्यावर आसिफने न्यूयॉर्कमध्ये एका मारेकऱ्याला हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता.
एका अज्ञात इसमाने मर्चंटविषयी पोलिसांना कळविले होते. ज्यानंतर पोलिसांनी आसिफला ताब्यात घेतले होते. अमेरिकेच्या संघीय न्यायालयाने 16 जुलै रोजी त्याला अटक करण्याचा आदेश दिला होता.
मर्चंटचे इराणशी कनेक्शन
मर्चंट हत्येचा एक धोकादायक कट रचत होता, हा कट उधळण्यात आला आहे. मर्चंटचे इराणशी थेट कनेक्शन आहे. इराणनेच अमेरिकेच्या नेत्यांच्या हत्येसाठी त्याला पाठविले होते असे एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी सांगितले आहे. न्यायालयासमोर मांडलेल्या दस्तऐवजात कुणाच्या हत्येचा कट हाणून पाडला हे नमूद नाही, परंतु मर्चंट हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत होता असे मानले जात आहे. ही माहिती समोर आल्यावर अमेरिकेच्या प्रशासनाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
इराणकडून कट
13 जुलै रोजी पेन्सिल्वेनियाच्या बटलर शहरात एका सभेला संबोधित करत असताना ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात इराणचा हात होता का हे अद्याप समोर आलेले नाही. इराणकडून माझी हत्या करण्यात आली तर अमेरिका त्याचे अस्तित्व संपुष्टात आणेल अशी आशा असल्याचे ट्रम्प यांनी गोळीबाराच्या घटनेनंतर म्हटले होते.
सुलेमानीच्या हत्येमुळे इराण अस्वस्थ
इराणने मागील वर्षी देखील ट्रम्प यांना मारण्याची धमकी दिली होती. इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानीच्या हत्येत सामील असलेल्या सर्व लोकांना आम्ही ठारू करू इच्छितो आणि यात ट्रम्प देखील सामील असल्याचे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड एअरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनी म्हटले होते. 3 जानेवारी 2020 रोजी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतरच अमेरिकेचे सैन्य आणि सीआयएने मिळून कासिम सुलेमानीला ड्रोन हल्ल्याद्वारे ठार केले होते.