For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुक्त शिक्षणाचा नवा प्रवाह

06:46 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुक्त शिक्षणाचा नवा प्रवाह
Advertisement

भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा एक विशाल, अवाढव्य देश आहे. खेड्यापाड्यात पसरलेला आहे. अजूनही अनेक प्रकारची विषमता आहे. आता आता शिक्षणाची कोवळी किरणे दऱ्याखोऱ्यात पोहचत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आजही 3.22 कोटी मुले देशपातळीवर शिक्षणप्रवाहाबाहेर आहेत. शिक्षण व्यवस्थेसमोर हे एक मोठे आव्हान आहे.

Advertisement

एवढ्या मोठ्या संख्येने मुले शाळेच्या बाहेर असण्याची विविध कारणे आहेत. आर्थिक मागासलेपणा बरोबर इतरही अनेक कारणे दिसून येतात. बालकांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा येऊनही सुमारे पंधरा वर्षे झाली. तरीही ही स्थिती आहे. शाळेत प्रवेश घेतल्यावरही वेगवेगळ्या टप्प्यांवर शाळा, शिक्षण सोडणाऱ्यांची संख्याही खूप आहे. त्याचीही अनेक कारणे आहेत. परंपरागत शिक्षण व्यवस्था आणि पारंपरिक शिक्षणपद्धत सर्वांच्या गरजा भागवू शकत नाही. ही कमतरता दूर करण्याच्या हेतूने पर्यायी शिक्षणाची व्यवस्था हवी. दूरस्थ व मुक्त शिक्षण ही ती पर्यायी व्यवस्था.

मुक्त विद्यालय आणि मुक्त विद्यापीठ अशा दोन व्यवस्था अनुक्रमे शालेय स्तरावर आणि उच्च शिक्षणासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत. मुक्त विद्यापीठांची 1982 तर मुक्त विद्यालयांची निर्मिती 1989 मध्ये झाली. कोरोनानंतर मुक्त विद्यापीठांची अधिक चर्चा सुरू झाली. युरोपियन कमिशनने केलेल्या व्याख्येनुसार मुक्त शिक्षण म्हणजे A way of carrying out education, offen using digital technologies. Its aim is to widen access and participation to everyone by removing barriers and making learning accessible, abundant and customimgable to all.

Advertisement

खरे तर मुक्त शिक्षणाच्या स्वतंत्र आणि वेगळ्या व्याख्येची गरजच नाही. मुक्त शिक्षण यातच सगळे येते. मुक्त शिक्षणात शिक्षणाची विशिष्ट जागा, विशिष्ट वेळ व विशिष्ट अभ्यासक्रम यापासून मुक्तता अपेक्षित आहे. पण शिक्षक व विद्यार्थी या संज्ञा असणारच.

मुक्त शिक्षणाची वैशिष्ट्यो

  1. मुक्त अनौपचारिक पद्धतीने शिक्षण. 2. शिक्षक व विद्यार्थ्यांत वेळ/स्थळात अंतर. 3. एखादी शैक्षणिक संस्था मुक्त शिक्षण प्रमाणित करते. 4.वेगवेगळ्या व एकापेक्षा अधिक माध्यमांचा वापर. 5.विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून गरजेनुसार संपर्क सत्रांचे आयोजन. 6.आवश्यकतेनुसार तंत्रज्ञानाचा वापर. 7.बहुविध प्रकारचे विषय, गरजाधिष्ठित व्यावसायिक अभ्यासक्रम. 8. वय, लिंग, वंश, आर्थिक व सामाजिक स्तर यांचा विचार न करता कुवत, गरज व इच्छा यांना महत्त्व. 9. शाळाबाह्या मुले, वंचित घटक, ग्रामीण युवक, ग्रामीण व शहरी गरीब मुले, मुली, स्त्रिया, तृतियपंथी हे सगळे लक्ष्यगटात येतात. 10. नोकरी करणाऱ्या महिला व पुरूष, दिव्यांग, माजी सैनिक यांनाही शिक्षणाची संधी. 11. अर्धवट शाळा सोडलेल्यांना, शिक्षक, प्राध्यापक, कारागीर इत्यादींना पुढचं शिक्षण घेण्याची संधी. 12. आपले ज्ञान वाढावे, ज्ञान अद्ययावत व्हावे, वेळेचा सदुपयोग व्हावा, आर्थिक स्तर उंचावणे, समाजात प्रतिष्ठा मिळावी असे वाटणाऱ्यांना मुक्त शिक्षणाची दारं सदैव खुली असतात.when we learn, we do not earn.

And when we earn, we do not learn.

आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा कमवत नाही. आणि कमवतो तेव्हा शिकत नाही. खरे तर शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया. सतत काहीतरी शिकत राहिले पाहिजे अशी इच्छा असणाऱ्यांसाठीही मुक्त विद्यापीठ हे एक व्यासपीठ आहे. लवचिकता हे मुक्त शिक्षणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्या आहे. निरंतर शिक्षणाची गरज मुक्त शिक्षण व्यवस्था भागवते. काही कारणांमुळे औपचारिकपणे शाळा, महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून शिक्षण घेणे ज्यांना शक्य नाही, त्यांना घरबसल्या दूरस्थ शिक्षण माध्यमातून शिक्षण घेता येते. सध्या ज्ञानाचा विस्फोटाचा काळ आहे. अशा काळात अद्ययावत ज्ञान घेण्याची एक सुवर्णसंधी आहे. सेवेत बढती मिळविण्यासाठी पात्रता आणि कौशल्ये हवीत. नोकरी सांभाळून पात्रता वाढविण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना मुक्त शिक्षणाचा फायदा करून घेता येतो. शालेय स्तरावर राष्ट्रीय मुक्त शिक्षण विद्यालय ही व्यवस्था उपलब्ध आहे. 1986 शैक्षणिक धोरणानुसार रा. मु. शि. वि. मंडळाची स्थापना झाली आणि 1989 ला या मंडळाला स्वायत्त दर्जा मिळाला. या अंतर्गत पाच विभाग असून तेवीस विभागीय केंद्र, चार उपविभागीय केंद्रे आणि 7400 अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून देश आणि विदेशातही मंडळाचे कार्य चालते. 2021 सालचे युनेस्को इंटरनॅशनल लिटरसी अवार्ड एन. आय. ओ. एस. ला शिक्षणातील नवोपक्रमासाठी प्राप्त झाले आहे.

उच्च शिक्षणस्तरावर मुक्त विद्यापीठ ही व्यवस्था आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांनी मुक्त विद्यापीठाची कल्पना प्रथम मांडली. 1969 साली जगातले पहिले मुक्त विद्यापीठ ब्रिटनमध्ये स्थापन झाले. आज आपल्या देशात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ ‘इग्नू’ ही मुक्त शिक्षणामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते. विविध राज्यांमध्ये या विद्यापीठांतर्गत सुमारे 17 मुक्त विद्यापीठे पारंपरिक विद्यापीठांतर्गत 82 दूर शिक्षण संस्था, विद्यापीठे व खासगी अशा 256 संस्था कार्यरत आहेत. 50 लाखांहून अधिक विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत. शिक्षण तज्ञांच्या मतानुसार, जेथे संवाद आहे, खुली चर्चा आहे, भावनांची उत्कटता आहे, निपक्षपाती वातावरण आहे, स्वागत सभा, चळवळी, प्रेम यांचे जीवन आहे ते विद्यापीठ म्हणजे मुक्त विद्यापीठ होय. प्रा. राम ताकवले यांच्या मतानुसार, दूर शिक्षणाचा वापर करून अनौपचारिक शिक्षण देणारी संस्था म्हणजे मुक्त विद्यापीठ होय.No one can teach him who does not wish to learn. असे म्हणतात, ज्याला शिकायचेच नाही त्याला कोणीच शिकवू शकत नाही. याच विचाराची दुसरी बाजू म्हणजे ज्याला शिकायचेच आहे त्याला कोणी अडवू शकत नाही. एकलव्य हे उत्तम उदाहरण आहे. आजही एकलव्य आहेत आणि सर्व सुविधा असूनही न शिकणारे पण आहेत. गावोगावी, शाळाशाळांमधून फिरताना विद्यार्थी, शिक्षक, पालकांशी बोलताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. तक्रारी करणारे, रडगाणे गाणारे, कुरकुर करणारे खूप दिसतात. कोणीतरी आपल्या हातात आणून सगळे द्यावे अशा आशेत असणारेही असतात.

शिक्षण हा स्वत:ला घडवण्याचा राजमार्ग आहे. त्यावरून ज्याला जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी मुक्त शिक्षणाचा सुंदर, युगानुकूल यशोमार्ग आहे. त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संधी दरवाजा ठोठावत असते. दरवाजा उघडून संधीचे स्वागत करायचे की नाही हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. शिक्षणाची संधी मिळाली नाही असे यापुढे तरी ऐकायला न मिळो.

- प्रा. दिलीप वसंत बेतकेकर

Advertisement
Tags :

.