For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केरळमध्ये नवा राजकीय वाद

06:54 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
केरळमध्ये नवा राजकीय वाद
Advertisement

टीपी चंद्रशेखरन यांच्या मारेकऱ्यांची मुक्तता होणार : काँग्रेसकडून विरोध

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

केरळमध्ये माजी माकप नेते टी.पी. चंद्रशेखरन यांच्या तीन मारेकऱ्यांची मुक्तता करण्याच्या आदेशामुळे राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून केरळच्या डाव्या सरकारवर निशाणा साधला आहे. हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना विशेष सूट देण्याच्या निर्णयावर काँग्रेस खासदार शफी परमबिल यांनी माकपला लक्ष्य केले. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने हा निर्णय घेतला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनाही या निर्णयाबद्दल पूर्ण माहिती असल्याची टीका परमबिल यांनी केली आहे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीत देण्यात आलेला हा निर्देश आहे. तुरुंग अधीक्षक स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत. आतापर्यंत ही यादी रद्द करण्यात आलेली नाही. हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार आहे. आम्ही याला राजकीय आणि कायदेशीर दोन्ही प्रकारे विरोध करणार आहोत असे परमबिल यांनी स्पष्ट केले.

माकप याप्रकरणी सुधारणात्मक उपाययोजनांचा दाखला देत आहे. परंतु ते न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासत आहेत. उच्च न्यायालयाने टी.पी. चंद्रशेखरन यांच्या मारेकऱ्यांना 20 वर्षांपर्यंत कुठलीच सूट देऊ नये असे स्पष्ट केले असल्याचा दावा परमबिल यांनी केला.

मारेकऱ्यांच्या पाठिशी माकप

तुरुंग अधीक्षकांनी 56 गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. यातील तीन जणांना न्यायालयाने कुठलीच सूट देऊ नये असे बजावले आहे. तर माकप या गुन्हेगारांना आता पक्ष तुमच्या पाठिशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार त्यांना वाचविण्यासाठी काहीही करू शकते, कायद्याचे उल्लंघन करण्याचीही माकप सरकारची तयारी असल्याचा आरोप वडकाराचे खासदार शफी परमबिल यांनी केला आहे.

13 जूनला पाठविले पत्र

केरळच्या गृह विभागाने मुक्तता केल्या जाणाऱ्या कैद्यांची यादी तयार केली आहे. कन्नूर तुरुंग अधीक्षकांनी कन्नूर शहर पोलीस आयुक्तांकडूनही अहवाल मागविला आहे. टी.पी. चंद्रशेखरन यांच्या तीन मारेकऱ्यांची मुक्तता करण्याचा प्राथमिक प्रस्ताव असल्याचे 13 जून रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले गेले आहे.

2012 मध्ये हत्या

केरळच्या कोझिकोड जिल्ह्याच्या ओंचियामध्ये टी.पी. चंद्रशेखरन यांनी 2009 साली माकपला रामराम ठोकत स्वत:चा नवा पक्ष रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या पक्षाने स्थानिक निवडणुकीत अनेक जागांवर विजय मिळविला होता.  या पार्श्वभूमीवर 4 मे 2012 रोजी टी.पी. चंद्रशेखरन यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी 15 माकप कार्यकर्त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. आता यापैकी 3 मारेकऱ्यांची मुक्तता केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.