चीनमध्ये फैलावला नवा रहस्यमय आजार
वृत्तसंस्था/ बीजिंग
5 वर्षांपूर्वी 2019 च्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातील रुग्णालयाचे काही व्हिडिओ समोर आले होते, ज्यात लोक श्वसनावेळी त्रास आणि खोकल्याच्या तक्रारींसह रुग्णालयात भरती होताना दिसून आले होते. त्यानंतर हे आरोग्य संकट पूर्ण जगासमोर उभे ठाकले होते. या संकटाला कोविड-19 नाव देण्यात आले होते. 5 वर्षांनंतर चीनमध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती होत असल्याची चर्चा आहे. चीनच्या रुग्णालयांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून यात लोकांची मोठी गर्दी दिसून येत आहेत. ह्यूमन मेटोप्रयूमोव्हायरस आणि अन्य व्हायरसच्या प्रकोपामुळे रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरसमध्ये इन्फ्लुएंजा ए, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सामील आहे.
व्हिडिओत रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये वृद्ध रुग्णांची गर्दी दिसून येते. चीनची रुग्णालये इन्फ्लुएंजा ए आणि ह्यूमन मेटाप्र्रेयूमोव्यहारसच्या प्रकोपाला सामोरे जात असल्याचे व्हायरल पोस्टमध्ये नमूद आहे.
परंतु या दाव्यांची कुठलीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कुठलीही नवी महामारी असल्याची पुष्टी दिलेली नाही. तसेच कुठलाही आपत्कालीन अलर्ट जारी केलेला नाही.
एचएमपीव्ही असा व्हायरस आहे, जो सर्वसाधारणपणे सर्दीसारखे लक्षण निर्माण करतो. छोटी मुलं, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारकक्षमता असलेले लोक याचे शिकार ठरू शकतात. याच्या लक्षणांमध्ये खोकला, ज्वर, नाक बंद होणे सामील आहे. परंतु हा व्हायरस न्युमोनिया आणि ब्रोंकियोलायटिस सारखे गंभीर श्वसनाचे आजार निर्माण करू शकतो. एचएमपीव्हीचा फैलाव कोविड-19 सारखाच आहे. हे संक्रमित व्यक्तीच्या शिंकेतून निघालेल्या थेंबामुळे फैलावतो. तसेच व्हायरस संक्रमित पृष्ठभागांना स्पर्श केल्यासही संक्रमणाचा धोका असतो.