कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यातील 55 गावांचा नवा मास्टर प्लॅन बनविणार

12:23 PM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची पत्रकार परिषदेत माहिती : सह्याद्रीनगर, मुत्यानहट्टी येथे दोन तलाव निर्माण करण्याचा निर्णय

Advertisement

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील 55 गावांचा समावेश बुडाच्या व्याप्तीत करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचबरोबर सह्याद्रीनगर आणि मुत्यानहट्टी या ठिकाणी दोन नवीन तलाव निर्माण करण्याचा निर्णय बुडाच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी बुडा कार्यालयात पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे होते. बैठकीला पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, बुडा सदस्य पुष्पा पर्वतराव, समीउल्ला माडिवाले, नीलेश चंदगडकर, राघवेंद्र भोवी, हणमंत कोंगाली यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

बैठकीनंतर बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेली कणबर्गी येथील स्कीम क्रमांक 61 साठी चौथ्यांदा निविदा काढण्यात आली होती. निविदा अंतिम करण्यात आली असून 130 कोटी रुपये निधीतून ही स्कीम राबविण्यात येत आहे. योजनेसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना विकसित केलेल्या जमिनीतील 50 टक्के भूखंड दिले जाणार आहेत. तांत्रिक मंजुरी मिळावी, यासाठी हा प्रस्ताव बेंगळूरला पाठविण्यात आला आहे. त्याला अनुमोदन मिळताच विनाविलंब काम सुरू केले जाणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांनीदेखील महत्त्वाचे सहकार्य केले आहे. 13 वर्षांपासून रखडलेली ही योजना सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावण्यात यश आल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर बुडाकडून 30 नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी 24 कामांची निविदा पूर्ण झाली आहे. या माध्यमातून रस्ते, उद्यानांची कामे सुरू आहेत. उर्वरित 5 कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहेत.

मुत्यानहट्टी येथे 13 एकर जागेत तलाव बांधण्यात येणार असून  यासाठी 5 कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. त्याचबरोबर सह्याद्रीनगर येथे 5 कोटी 75 लाख रुपये निधीतून तलाव निर्माण केले जाणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी तलावांचा विकास केला जाणार असून याचा शेतकऱ्यांनादेखील फायदा होणार आहे. केवळ तलावच नव्हे तर ते पिकनिक पॉईंट व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली आहे. तालुक्याच्या 55 गावांचा समावेश बुडाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आला आहे. 55 गावांचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. त्यामध्ये तीन कंपन्यांनी सहभाग नोंदविला असून मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. सरकारकडून परवानगी मिळताच विनाविलंब काम सुरु केले जाणार आहे.

सध्या बेळगावचा जो मास्टर प्लॅन अंमलात आहे तो 2014 ला मंजूर झाला आहे. त्याची मुदत 31 मार्च 2021 रोजी संपली आहे. यापूर्वी बुडाच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील 27 गावांचा समावेश होता. त्यात आणखी 28 गावांचा समावेश करण्यात आला आहे. बेळगाव शहर आणि तालुक्याचा परिसर वाढत चालला असून नवीन मास्टर प्लॅनची गरज असल्याने सरकारने नवीन मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कोणतही विरोध केलेला नाही. बुडाच्या हद्दीत 55 गावांचा सामवेश झाला असल्याने त्याठिकाणी भूसंपादन करण्यात येणार नाही. यापूर्वी त्या गावांमध्ये ग्राम पंचायतीकडून लेआऊटला परवानगी दिली जात होती. मात्र यापुढे बुडाकडून लेआऊटसाठी परवानगी घेणे गरजेचे आहे ही नियिमत प्रक्रिया आहे.

शहरातील काही लेआऊटचे एन. ए. करून ती महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. अलिकडेच रामतीर्थनगरचे देखील महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले आहे. तेथील रहिवाशांना ई अस्थि अंतर्गत मिळकतींची महापालिकेकडे नोंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी बुडाकडून आवश्यक एनओसी देण्याची सूचना करण्यात आली असल्याचे बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी सांगितले. 24 कोटी रुपयांच्या निधीतून शहरांच्या रस्त्याचा विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर 108.05 कोटी रुपयांचे चालू आर्थिक वर्षातील बुडाचे शिलकी अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article