ट्रम्प यांच्य टीमध्ये नव्या भारतीयाची एंट्री
चंदीगडच्या हरमीत ढिल्लोंला महत्त्वाची जबाबदारी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये भारतीय वंशाच्या लोकांना अधिक स्थान मिळाले आहे. ट्रम्प यांनी आता आणखी भारतीय वंशीयाच्या नागरिकाला मोठी जबाबदारी सोपविली आहे. भारतीय अमेरिकन वकील हरमीत ढिल्लों यांना न्याय विभागात नागरी अधिकारांसाठी सहाय्यक अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्याचा निणंय ट्रम्प यांनी घेतला आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागात नागरी अधिकारांसाठी सहाय्यक अॅटर्नी जनरलच्या स्वरुपात हरमीत ढिल्लो यांची नियुक्ती करताना मला आनंद होतोय. स्वत:च्या पूर्ण कारकीर्दीत हरमीत आमच्या प्रतिष्ठित नागरी स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सातत्याने उभ्या राहिल्या आहेत. हरमीत अमेरिकेच्या आघाडीच्या वकिलांपैकी एक आहेत असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
ढिल्लो यांनी मुक्त भाषणावर बंधने आणणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांना वठणीवर आणले आहे. तसेच कोरोना महामारीदरम्यान प्रार्थना करण्यापासून रोखण्यात आलेल्या ख्रिश्चनांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. हरमीत या शिख समुदायाच्या एक प्रतिष्ठित सदस्य आहेत. हरमीत आमच्या घटनात्मक अधिकारांच्या अथक रक्षक असतील आणि आमच्या नागरी अधिकार आणि निवडणूक कायद्यांना निष्पक्ष तसेच दृढपणे लागू करतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
टम्पि यांच्या टीममध्ये निवड झाल्याने आणि अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त झालेल्या पाम बॉन्डी यांच्या नेतृत्वात काम करता येणार असल्याने मला गौरवाची अनुभूती होत असल्याचे हरमीत यांनी नमूद केले आहे.
हरमीत ढिल्लो यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. तर बालपणीच त्या आईवडिलांसोबत अमेरिकेत स्थलांतरित झाल्या होत्या. हरमीत यांच्यापूर्वी ट्रम्प प्रशासनात 3 भारतीय वंशीयांना स्थान मिळाले आहे. 44 वर्षीय आकाश पटेल, तुलसी गबार्ड आणि विवेक रामास्वामी हे ट्रम्प प्रशासनाता महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना दिसून येणार आहेत.