शालेय शिक्षणाला नवा आयाम!
नवे शैक्षणिक वर्ष आता 1 एप्रिलपासून : उन्हाळी सुट्टी नेहमीप्रमाणे मे महिन्यात,सुट्टीनंतर 4 जूनपासून पुन्हा वर्ग सुरू,सुट्ट्यांमध्ये, वेळेत कोणताही बदल नाही
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीचा भाग म्हणून राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष यंदापासून 1 एप्रिलपासून प्रारंभ करण्याचा ऐतिहासिक निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग 1 ते 30 एप्रिल या कालावधित रोज सकाळी 11.30 पर्यंत चालणार आहेत, असे शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. शालेय सुट्ट्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1 मे ते 3 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असेल व त्यानंतर 4 जूनपासून पूर्वीप्रमाणेच वर्ग प्रारंभ होणार आहेत. हा आदेश राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांसाठी लागू आहे. त्यासंबंधी सर्व शाळांनी परिपत्रक सूचना फलकावर लावावे. यासंबंधी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांना माहिती देण्यात यावी. पहिल्या टप्प्यात केवळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी हा बदल लागू राहणार आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
तास भरुन काढण्यासाठी बदल
शैक्षणिक धोरणानुसार आठवड्याला 36 ते 39 तास शिकवणी होणे आवश्यक असते. शिकवणीचे हे तास भरून काढण्यासाठीच एप्रिलमध्ये वर्ग घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे वरील कालावधित अतिरिक्त वर्ग घेतल्याने शिकवणीचे तास भरून निघणार आहेत. आतापर्यंत शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरू होत असे. त्यामुळे एप्रिलमध्ये अंतिम परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना महिन्यापेक्षा जास्त दिवस सुट्टी असायची. यापुढे ही पद्धती बंद होणार आहे. राज्यात नाही म्हटले तरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी इयत्ता नववी वर्गापासून सुरूही झालेली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण सहावी व दहावीसाठी लागू होईल. अकरावीचे शैक्षणिक वर्ष मात्र जूनमध्येच सुरू होणार आहे.
समाजकार्यकर्त्यांचा विरोध
एप्रिल महिन्यापासून गोव्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास काही समाज कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला असून तसे निवेदन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना सादर केले आहे. संजय बर्डे, शंकर पोळजी, दीपेश नाईक आणि सतीश मोटे यांनी संयुक्तपणे ते निवेदन दिले आहे.
विद्यार्थ्यांना अपार ओळखपत्र अनिवार्य
शिक्षण खात्याने जारी केलेल्या अन्य एका परिपत्रकानुसार एखाद्या विद्यार्थ्याला परराज्यात किंवा राज्यांतर्गत शाळा बदल करायची असल्यास तसेच माध्यान्ह आहार, मोफत पाठपुस्तके किंवा अन्य कोणत्याही शैक्षणिक सवलती मिळवायच्या असतील तर त्यासाठी अपार आयडी कार्डचा क्रमांक उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कार्ड नसेल तर त्याला सरकारच्या कोणत्याही सवलती, योजनांचा लाभ घेता येणार नाही, असे त्यात म्हटले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना अपार आयडी क्रमांक देण्याची व्यवस्था करावी. ही प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी, असेही परिपत्रकात सूचविण्यात आले आहे.
आज शाळा मुख्याध्यापकांची खास बैठक
या निर्णयाबाबत आणि विषयासंदर्भात शुक्रवारी म्हणजे आज शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यांना निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. शिवाय शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांची बैठक होणार आहे. या आधी दोन सत्रातील एक सत्र मोठे व दुसरे सत्र छोटे होते. आता त्यात समानता येणार आहे. मध्यान्ह आहाराची वेळही त्या निर्णयामुळे भरुन काढणे शक्य होणार आहे, असेही शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
म्हणून शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही करण्यासाठी शाळांची वेळ बदलणे भाग होते तथापि ती बदलणे शक्य नसल्यामुळे आणि ती बदलावी लागू नये म्हणून शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरु करण्याचे ठरवले आहे, असा खुलासा शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी केला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टी व इतर सुट्टीत कोणताही बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील अनेक शाळांमधून सकाळी व दुपारनंतर विविध इयत्तांचे वर्ग चालतात. त्यामुळे नवीन धोरणानुसार शाळांची वेळ वाढवणे शक्य नाही. एप्रिल महिन्यात शाळा चालू केल्यामुळे शाळांची वेळ वाढवावी लागणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
-शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर