टेनिसमधील वैऱ्याचा नवा अध्याय !
टेनिसच्या जगतात विलक्षण शत्रुत्व हे नवं नाहीये...एकेकाळी बिओन बोर्ग व जॉन मॅकेन्रो, मॅकेन्रो व जिमी कॉनर्स, अलीकडे पीट सांप्रास नि आंद्रे अगासी अन् त्यानंतर नदाल, फेडरर व जोकोविच या महान त्रिकुटाची कहाणी तर खूपच प्रसिद्ध...आता त्यात नवा अध्याय जोडताहेत ते अल्काराझ नि सिनर हे दोन युवा खेळाडू. यंदाच्या इतर ग्रँड स्लॅम स्पर्धांप्रमाणं नुकत्याच संपलेल्या अमेरिकन ओपनमध्ये देखील दर्शन घडलं ते त्यांच्यातील या तुफान चुरशीचंच...
त्यांनी महान जोकोविचला डोकं वर काढण्याची संधी देखील दिलेली नाहीये...10 सप्टेंबर, 2023 पासून त्या दोघांची मस्तवाल वळूप्रमाणं झुंज चाललीय...खेरीज त्यांनी गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेचं अजिंक्यपद खिशात घातलंय. दोन वर्षांपूर्वी सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं विक्रमी 24 वा ग्रँडस्लॅम किताब मेदवेदेवचा पराभव करून न्यूयॉर्क इथं मिळविल्यानंतर त्याच्यावर अक्षरश: पाळी आलीय ती मागील 24 महिन्यांत फक्त गटांगळ्या खाण्याची...त्या दोन युवा खेळाडूंची नावं...स्पेनचा कार्लोस अल्काराझ आणि इटलीचा जॅनिक सिनर...
या दोघांनी टेनिस खेळाला अक्षरश: दावणीला बांधलंय असं म्हटल्यास ते अजिबात चुकीचं ठरणार नाहीये...वर्ष 2024...सिनर व अल्काराझ यांनी प्रत्येकी दोन ग्रँड स्लॅम स्पर्धांची जेतेपदं घरी नेण्यात यश मिळविलं. इटलीच्या खेळाडूनं ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन जिंकली, तर स्पॅनिश टेनिसपटूनं विम्बल्डन नि फ्रेंच...त्यानंतर यंदाच्या वर्षातही चित्र पाहायला मिळालंय ते असंच. अल्काराझनं फ्रेंच व अमेरिकन स्पर्धांचे मुकुट मिळविलेत, तर सिनरनं ऑस्ट्रेलियन ओपन नि विम्बल्डनचे...
विशेष म्हणजे या जोडीनं तब्बल पाच वेळा जोकोविचचा फडशा पाडलाय. सिनरनं 2024 मधील ऑस्ट्रेलियन ओपन, यंदाचं विम्बल्डन अन् त्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये, तर अल्काराझनं गतवर्षीच्या विम्बल्डन नि यंदाच्या अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत हा पराक्रम गाजविला. जोकोविचला त्या लढतींत जिंकता आला तो केवळ एक सेट. सध्याचा एकही खेळाडू अल्काराझ नि सिनरचं सातत्य आणि कामगिरी यांना आव्हान देण्याच्या स्थितीत नाहीये...
अल्काराझनं आतापर्यंत एकूण सहा ग्रँड स्लॅम स्पर्धांची जेतेपदं मिळविलेली असून सिनर बसलाय तो चार किताबांवर. 22 वर्षांचा असताना जोकोविचला 2008 सालची ऑस्ट्रेलियन ओपन ही केवळ एक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणं शक्य झालं होतं, पण त्यानंतर 2011 पर्यंत तो उपाशीच राहिला...महान रॉजर फेडररनं 23 वर्षं होण्यापूर्वी तीन ग्रँड स्लॅम किताब खिशात घातले होते...तर अचानक धूमकेतूप्रमाणं धडक दिलेल्या स्पेनच्या नदालनं 23 वं वर्ष संपण्यापूर्वी सहा ग्रँडस्लॅम मुकुट आपल्या डोक्यावर चढविलेले असले, तरी त्यातील तब्बल चार त्यानं मिळविले ते रोलँ गॅरोवर म्हणजेच फ्रेंच ओपन स्पर्धेत...
या वैऱ्याची सुरुवात झाली ती 2021 सालच्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेतून. त्यावेळी कार्लोस अल्काराझनं जॅनिक सिनरवर सरळ सेट्समध्ये मात केली ती 7-6, 7-5 अशी. पुढच्या विलक्षण झुंजींची ती चुणूक होती. मग हळूहळू ‘एटीपी टूर’चा तो भागच बनला. दोन्ही खेळाडूंची शैली वेगवेगळी असल्यानं सामने प्रचंड रंगायला लागले. त्यांच्यातील स्पर्धेची तीव्रता वाढत गेली...
अल्काराझवर 6-1, 6-4, 6-7, 6-3 अशी विम्बल्डनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मात केल्यानंतर सिनरनं क्रोएशियन ओपनच्या अंतिम फेरीत स्पॅनिश खेळाडूचा 6-7, 6-1, 6-1 असा पुन्हा एकदा फडशा पाडला होता...अल्काराझनं त्याचा बदला घेतला तो अमेरिकन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत कारकिर्दीतील एका उत्कृष्ट विजयाची नोंद करून (6-3, 6-7, 6-7, 7-5, 6-3). त्यानंतर ती स्पर्धां जिंकण्यापर्यंत त्यानं मजल मारली. ते होतं त्याचं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद...2023 मध्ये सिनरनं अल्काराझचा मियामी आणि चीन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव केला, तर स्पेनच्या खेळाडूनं बाजी मारली ती इंडियन वेल्समध्ये...त्यानंतरचा इतिहास ताजा आहे...
सिनरच्या यंदाच्या विम्बल्डन विजयामुळं ब्रेक बसला तो अल्काराझच्या ग्रास कोर्टवर सलग तीन किताब मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेला (हार्ड कोर्टवरील ग्रँड स्लॅममध्ये 27 सामने चाललेली सिनरची विजयी घोडदौड रोखून स्पॅनिश खेळाडूनं त्याचा वचपा काढलाय)...त्यानंतर अल्काराझनं न्यूयॉर्कमध्ये स्वत:चा जम बसविण्याकडे मोर्चा वळविला. त्यानं प्रशिक्षक नि एकेकाळचे जगातील अव्वल खेळाडू जुआन कार्लोस फेरेरो यांच्यासोबत बसून लक्ष केंद्रीत केलं ते विम्बल्डन आणि रोलँ गॅरो येथील इटालियन खेळाडूविरुद्धच्या अलीकडील दोन सामन्यांवर. मग कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करायचीय अन् सिनरला कुठं तडाखा दिला जाऊ शकतो याचा काटेकोर अभ्यास केला गेला. खेरीज जर अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचून सिनरशी गाठ पडली, तर काय करायचं याचा सराव करण्याकरिता 15 दिवसांचं विशेष प्रशिक्षण सत्र राबविण्यात आलं...
‘विम्बल्डऩनंतर लगेच मला वाटलं की, जर सिनरला हरवायचं असेल, तर काही गोष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं सिनसिनाटीच्या आधी मी माझ्या खेळाच्या अनुषंगानं काही विशिष्ट बाबींचा सराव केला’, अल्काराझ सांगतो...परिणामस्वरूप आठ आठवड्यांनंतर जे घडलं ते सेंटर कोर्टवरील निकालाच्या पूर्णपणे उलट होतं...‘त्यानं सुधारणा केलीय. मी लंडनमध्ये ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं केल्या, त्यात तो एक पाऊल पुढं गेलाय. त्यानं सर्व काही थोडंसं चांगलं केलं, विशेषत: दोन्ही बाजूंनी सर्व्हिंग’, सिनरनं अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीनंतर म्हटलं...या दोन्ही खेळाडूंमधील शत्रुत्व आणखी भडकत जाणार हे स्पष्टपणे दिसतंय. त्यापैकी कोण जोकोविचचा विक्रम तुडवतो ते पाहायचंय !
वैऱ्याचा ‘फ्रेंच अँगल’...
- यंदाच्या फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पहिले दोन सेट गमावल्यानंतर सुद्धा अल्काराझ विजयी ठरला. त्यानं सिनरविरुद्ध तीन मॅच पॉइंट्स देखील वाचविले...
- फ्रेंच स्पर्धा संपेपर्यंत अल्काराझनं पाच सेट चाललेले दहा सामने सतत जिंकले होते...
- टेनिसच्या इतिहासाताली अजूनपर्यंत सर्वांत जास्त वेळ चाललेली लढत म्हणजे जोकोविच विरुद्ध नदाल. 2012 सालच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत दोन्dही खेळाडू तब्बल 5 तास 53 मिनिटं झुंजले...फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अल्काराझ व सिनर यांच्यातील लढत देखील 5 तास 29 मिनिटं चालली...तिसरा क्रमांक मिळविलाय तो नदाल व मेदवेदेव यांनी. पहिले दोन सेट गमावल्यानंतर सुद्धा 5 तास 24 मिनिटं चाललेली लढत स्पेनच्या राफा नदालनं जिंकली...
- राजू प्रभू